अमित ठाकरे यांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई – राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असा हाती आला. महाराष्ट्राचे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले असले तरी देखील अद्याप त्यावरुन राजकारण रंगले आहे. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावर लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन संशय घेतला आहे. त्याचबरोबर याच पद्धतीची भूमिका मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतली होती. यावरुन अजित पवारांनी त्यांना डिवचले होते. यावर आता अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार निवडून आले होते. त्यानंतर दोनच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतकी तफावत कशी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. “अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असे सगळ्यांना वाटत होते. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त 10 जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय घेतला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांनी थेट टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना खडेबोल सुनावले होते. राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले की, “राज ठाकरे यांनी त्यांना जे काय वाटते, ते म्हटले. त्याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. जनतेने आम्हाला निवडून दिले. लोकसभा निवडणुकीत जेव्हा महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि आम्हाला सांगता. यावेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत केली होती. म्हणून आमचे आमदार निवडून आले. मलाही मागे माझ्या मुलाला निवडून आणता आले नव्हते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून आणता आले नाही. तो कौल लोकांनी दिला होता, ईव्हीएममध्ये गडबड झाली, असे आम्ही म्हणालो नाही. जनतेने मतदान केले, लोकशाहीत आपण ते मान्य केले पाहीजे.” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवारांनी राज ठाकरे यांना तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही असा टोला लगावला होता. यामुळे आता अमित ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित ठाकरे यांनी अजित पवारांना सुनावले आहे. अमित ठाकरे म्हणाले की, अजित पवारांवर बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. यावर राज ठाकरेच उत्तर देऊ शकतील. पण मी पराभूत झालो असलो तरी खचलो नाही. या निवडणुकीतून मी खूप शिकलो. त्यामुळे मला फरक पडत नाही. मी एवढेच सांगेन की, माझ्या पहिल्या निवडणुकीवरून तर शेवटच्या निवडणुकीवरून माझे मूल्यमापन करा.” असे चोख प्रत्युत्तर अमित ठाकरे यांनी दिले आहे.