हिंदी भाषा सक्तीवरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Monsoon Session 2025 : मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. महायुती सरकारकडून हिंदी भाषेबाबत दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आले आहेत. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रितपणे मोर्चा निघणार होता. मात्र त्यापूर्वी सरकारने आदेश रद्द केल्यामुळे आता मोर्चा नाही तर विजयी सभा घेतली जाणार आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारने निर्णय मागे घेतल्याचे श्रेय मराठी माणसांना दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, “मनसे आणि शिवसेना उबाठाने ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाची तयारी सुरु केली होती. त्याचे सर्व नियोजन झाले होते. मराठी ताकदीला घाबरुन सरकारने निर्णय मागे घेतला. या मोर्चासाठी जी तयारी झाली होती, त्याचा उपयोग आता विजय मेळावा करण्याबाबत चर्चा सुरु आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “राज्यात हिंदी सक्तीचा अध्यादेश राज्य सरकारने मागे घेतला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी व्यक्तींची ताकद दिसली. दोन्ही भावांचे एकत्र येणे महाराष्ट्राच्या हितासाठी महत्वाचे होते. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात मराठी ताकदीचा भूकंप होणार होता. त्यामुळे सरकारने निर्णय मागे घेतला. जे मोर्चासाठी एकत्र आले, त्या सर्वांना या विजय मेळाव्याचे आमंत्रण देणार आहोत. कुणाला दूर ठेऊन विजय जल्लोष होणार आहे,” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याबाबत माशेलकर यांचा अहववाल तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने स्वीकारला असल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिसूत्री स्वीकारली असून यानंतर आता सत्तेबाहेर असल्यामुळे मोर्चा काढत असल्याचा आरोप भाजप नेत्य़ांनी केला आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “भाजप खोट्या अफवा पसरवणारी फॅक्टरी आहे. देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत. जसे नरेंद्र मोदी, अमित शाह खोटे बोलतात, तसे फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय धोरणाप्रमाणे खोटे बोलत आहेत. तुम्ही माशेलकर अहवाल मांडत का नाही?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.