फोटो - सोशल मीडिया
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी उलथा पालथ झाली आहे. अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून काहींनी वेगळी भूमिका देखील घेतली आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन सावळी हे नाराज आहेत. ते लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे नाराज असल्यामुळे शिंदे गट किंवा भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. यावरुन खासदार संजय राऊत म्हणाले की, “शिंदे कोणत्या वाटेवर ते पहा ना आधी. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं हे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालंय त्यामुळे शिंदे अस्वस्थ आहेत. अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का आमिषं दाखवली जात आहे, सत्तेचा धाक दाखवला जातोय हे खरं आहे. जे कमजोर हृदयाचे आहेत, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाहीये, पण शिवसेनेत अजूनही खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, “नवीन कार्यकर्ते तयार करायचा कारखाना आहे शिवसेना, आम्ही (कार्यकर्ते) तयार करायचे आणि मग भाजपने किंवा इतर पक्षांनी ते घ्यायचे, हा गेल्या 50 वर्षांचा ठेकाच आहे. याचा अर्थ शिवसेनेची बस रिकामी होते असा नाही. पुढल्या दारातून उतरले की मागच्या दारातून लोकं परत चढतात, आमची बस भरलेलीच आहे. राजन साळवींशी माझी चर्चा झालेली आहे. पराभवानंतर ते थोडे अस्वस्थ आहेत, राज्यात आमचा जो पराभव झाला त्याची कारणं आम्ही शोधतो आहोतच. राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाट्याला येतो, तो जर पचवायची हिंमत नसेल तर त्याने स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे?
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर येत आहे. याबाबत टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले की,”देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे? किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे? किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आहेत? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच एसआयटी स्थापन केली पाहिजे. बीडच्या हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत असं कळलं आहे. कारण शेवटी ही महाराष्ट्राची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी. एक वाल्मिक कराडला अटक केली. पण बीडमध्ये हा खटला चालवू नये अशी माझी मागणी आहे. हा इतका गंभीर विषय आहे की हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे. महाराष्ट्रात कुठेही खटला चालला तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही तरीही मानतो की मुख्यमंत्र्यांवर सध्या तरी विश्वास ठेवू,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.