खासदार श्रीकांत शिंदे (फोटो- सोशल मीडिया)
शिवसेनेच्या उमेदवारांसाठी श्रीकांत शिंदेंचा प्रचाराचा धडाका
राज्यात 2 तारखेला होणार नगरपरिषद, नगरपंचायतसाठी मतदान
परतूर, अंबडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- शिंदे
परतूर/जालना: परतूर आणि अंबडमध्ये मागील अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांची सत्ता होती, मात्र येथे अनेक समस्या आहेत. राज्यात विकास कामे होत आहेत मात्र परतूर विकासापासून दूर आहे. परतूर आणि अंबडमध्ये शिवसेनेला सत्ता दिल्यास येथे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
जालना जिल्ह्यातील परतूर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री संजय शिरसाट, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार हिकमत उढाण संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर, पंडितराव भुदेकर, अभिमन्यू खोतकर आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
परतूर नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रेणुका हिवाळे आणि अंबड नगराध्यक्षपदासाठी सना पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार ड़ॉ. शिंदे म्हणाले की. महाराष्ट्रात लाडक्या बहिणीची वेगळी ताकद निर्माण झाली आहे. या लाडक्या बहिणींनी क्रांती करून दाखवली. या लाडक्या बहिणींचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेकडून परतूर आणि अंबडसाठी लाडक्या बहिणींना उमेदवारी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीला लोकसभेत ३१ जागा आल्या, त्यामुळे मवीआने विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ जाहीर केलं होतं. मात्र लाडक्या बहिणीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
राज्यात महायुती सरकारने लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. परतूरसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ५० कोटींचा विकास निधी देण्यात आला. लोकांना शिवसेनेबदद्ल वेगळा विश्वास वाटतोय. एकनाथ शिंदे बद्दल विश्वास वाटतोय. शेतकऱ्याचा मुलगा, एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हे केवळ आपल्या आशीर्वादाने झाले. शिंदे साहेब आश्वासने देत नाही तर दिलेला शब्द पूर्ण करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला सर्वांसाठी खुला होता.
Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
शेवटचा व्यक्ती भेटून जाईपर्यंत शिंदे साहेब झोपत नव्हते. शिवसेनेकडून जातीपातीचे राजकारण केले जात नाही. परतूरसाठी काही नसताना निधी येतो, नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर किती मोठा निधी मिळेल, याचा मतदारांनी विचार करावा, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. परतूर आणि अंबडच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मतदानापूर्वी अगोदर मतासाठी पैसे देणारे खूप येतील, आपलं मत खूप बहुमोल आहे. मतदान करताना योग्य विचार करून केलं पाहिजे. ज्याप्रमाणे विधानसभेला महायुतीत मतदान केले त्याप्रमाणे तुम्ही शिवसेनेला देखील मतदान केले पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले.






