"अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार!" 'मिसिंग लिंक'च्या भगदाडावरून अंजली दमानियांचे मुख्यमंत्री फडणवीसांना सडेतोड उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना कुत्रं विचारत नाही, ते सोशल मीडियावर पैसे घेऊन टिका करतात, असा आरोप केला. त्यांच्या या टिकेवर अंजली दमानिया यांनीदेखील पलटवार केला आहे. “फडणवीसांच्या वक्तव्यावरून अहंकार, फक्त आणि फक्त अहंकार दिसत असल्याचे म्हटले आहे. दमानिया यांनी ट्विट करत मिसिंग लिंकवरून फडणवीसांना धारेवर धरलं आहे.
अहंकार.. फक्त आणि फक्त अहंकार. मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा’? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात ‘देखलुंगा’. असा शब्दांत ट्विट करत अंजली दमानिया यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. “वैफल्य, अहंकार, माज वैगरे वैगरे… हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंडबाजीवर जनतेन बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!” असा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही, “मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ‘कुत्ते’, ‘भाडे के टट्टू’ आणि तत्सम अतिशय ‘सभ्य’ आणि ‘संसदीय’ शब्दांमध्ये मोठमोठ्याने दरडावून सांगितले की महाराष्ट्राची बदनामी करू नका.” अशा खोचक शब्दांत फडणवीसांना सुनावलं आहे.
पहाटेचा शपथविधी करणारे असोत किंवा ज्यांना ‘चक्की पिसायला लागेल’ असे आधी म्हटले गेले होते आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, त्या सगळ्यांना आता आपल्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसवून घेणारे कोण होते? यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला की सन्मान वाढला, हे त्याच सभागृहाच्या पटलावर ‘ऑन रेकॉर्ड’ सांगण्याचे कष्ट मुख्यमंत्री महोदय घेतील का?
अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






