पुण्यातील तरुणीवर अत्याचार प्रकरणावरुन रोहित पवार आक्रमक तर मुरलीधर मोहोळांच्या सूचना (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटेच्या साडेपाचच्या सुमारास ही अत्याचाराची घटना घडली. मुलीला फसवून पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये बसवून नराधमाने अत्याचार केला. पुण्यामध्ये हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी फटकारले आहे. तर पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मागणी केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,” असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, ही अपेक्षा!” अशा शब्दांत रोहित पवार यांनी लिहिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आहे.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 26, 2025
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर या प्रकारावर पुण्याचे खासदार व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुण्याचे पोलीस आयुक्तांना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी पुणे स्वारगेट परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना केलेल्या आहेत. माझ्या शहरातील कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणाबाबत पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे. “आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलं. आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी शिरुर गावचा आहे. त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. कालपासून आठ टीम काम करत आहेत. “पोलिसांच पेट्रोलिंग सुरु असतं. पण प्रत्येक बस पोलीस चेक करु शकत नाहीत. ही बस आतमध्ये होती. घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली. तिथे आरडाओरडा केला असता, तर तिला काही मदत मिळू शकली असती” असे मत पुणे पोलिसांनी व्यक्त केले आहे.