Piyush Goel Video: 'कॉकरोचेसना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी; पियुष गोयल यांच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य
Piyush Goel Video: देशात एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आधीच रोष वाढत चालला असतानाच आता केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पीयूष गोयल यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, PIB Fact Check ने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत संबंधित व्हिडिओ बनावट असून तो AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
PIB Fact Check ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट यांवर स्पष्टीकरण दिले आहे. काही पाकिस्तानी प्रचाराशी संबंधित सोशल मीडिया हँडल्सकडून हा बनावट व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पण तो खोटा असल्याचेही पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे.
PIB च्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून तो AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलनासंदर्भात पियूष गोयल यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
PIBच्या फॅक्टचेकनुसार, पियूष गोयल यांनी त्यांच्या अधिकृत वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचा उल्लेख केला होता. पेपर लीक प्रकरणातील दोषींना फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणखी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले होते.
याचबरोबर त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी या विषयाचे राजकारण करू नये, असे आवाहन केले होते. तसेच विरोधक चर्चा टाळत असून या मुद्द्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओमध्ये पियूष गोयल यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांना फाशी देण्यासारखे वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, PIB Fact Check च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले. तपासानुसार, AI च्या साहाय्याने पियूष गोयल यांचा आवाज कृत्रिमरीत्या बदलून तो चुकीच्या संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या व्हायरल व्हिडिओंवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून त्याची पडताळणी करण्याचे आवाहन PIB Fact Check ने केले आहे.






