CJP Protest Update: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर काय असेल CJPचा प्लॅन बी? आशुतोष रांकाने दिले उत्तर
CJP Protest Update: केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे सीजेपीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टीची पुढचा प्लॅन काय असेल, असा सवाल सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांना करण्यात आला. यावर रांका यांनी उत्तर दिले आहे.
सरकारने नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे माध्यमे आणि टिव्ही चॅनेल्सवर धर्मेद्र प्रधान राजनामा देणार नाही, असं सुत्रांच्या हवाल्याने सांगितले जात होते. असे असेल तर सरकारने याबाबत आम्हाला स्पष्टपणे सांगावे, असे असेल तर अशा बैठका निरर्थक ठरतील. त्यानंतर आमची जी रणनीती असेल त्यावर आम्ही काम सुरू करू. देशातील विद्यार्थ्यांना फक्त धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, जो खूप सोपा आहे पण जर तुम्ही तसं करणार नसाल तर आम्हालाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं आशुतोष रांका यांनी सांगितलं आहे.
आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे. या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.
सरकारने ४७ एनटीए (NTA) अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत ते म्हणाले, “आम्हाला अनेक तपशील तपासावे लागतील, पण आमचा मुद्दा तोच आहे. अंतिम जबाबदारी शिक्षणमंत्र्यांची आहे, कारण सर्व पेपरफुटी आणि नीट (NEET) पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आम्ही इतर मोठ्या सुधारणांवर सातत्याने चर्चा करत आहोत.”
सोनम वांगचुकच्या व्हिडिओ संदेशाबाबत आशुतोष रांका म्हणाले, “यापेक्षा अधिक लाजिरवाणे काहीही असू शकत नाही. ज्या व्यक्तीने २६ दिवस उपोषण करून आपला जीव धोक्यात घातला, ज्याने देशाच्या भविष्यासाठी इतके मोठे कार्य केले, त्याला उजव्या विचारसरणीचे लोक ट्रोल करत आहेत. यापेक्षा अधिक लाजिरवाणे काहीही असू शकत नाही.”






