पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने पुन्हा जोर धरला असून, शुक्रवारी (ता. २४) दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. सायंकाळनंतरही पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर विविध भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी (दि.25) सकाळपासून पावसाची चिन्हे दिसून आली नाहीत. दुपारनंतर उन्हाची तीव्रता मात्र वाढताना दिसली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुजरात किनारपट्टीपासून अरबी समुद्रापर्यंत सक्रिय झालेल्या पूर्व-पश्चिम द्रोणीय रेषा आणि तीव्र झालेल्या मान्सून वाऱ्यांमुळे उत्तर कोकण, नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी खूप जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, तेथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी तापमान 27 अंशांवर
शुक्रवारी पुणे शहरात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारी कमाल तापमान २८ अंश, तर किमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून, आकाश सामान्यतः ढगाळ राहील. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली, तरी घाटमाथ्यावर जोरदार ते खूप जोरदार पावसाचा इशारा कायम आहे.
नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट
मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके, बोटी, जीवनरक्षक साहित्य तसेच नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर






