संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : शहागंज परिसरातील १० वर्षीय मुलीच्या अपहरण व सुटका प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली रिक्षा आरोपीने घटनेच्या सुमारे तासभर आधी मनपा मुख्यालयासमोरून चोरी केल्याचे उघड झाले आहे. रिक्षाच्या नोंदणी क्रमांकावरून मालकाचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
राजाबाजार येथील ५१ वर्षीय व्यक्ती चेलीपुरा परिसरात दुरुस्तीसाठी दिलेला टीव्ही आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या १० वर्षीय नातेवाईक मुलीला शहागंज येथे भाजीपाला विक्री करणाऱ्या नातेवाईकाकडे काही वेळासाठी सोपविले. नंतर मुलीला कुरकुरे आणण्यासाठी बाहेर पाठविण्यात आले असता आरोपीने तिच्याशी संवाद साधला. ‘तुझी आंटी माझ्या ओळखीची आहे,’ असे सांगून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. १०० रुपये देत खाऊ आणण्याचे आमिष दाखवून तिला रिक्षात बसविले आणि अपहरण केले. घटनेनंतर मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
सीसीटीव्ही अन् तांत्रिक तपासावर भर
तपासादरम्यान रिक्षा क्रमांकावरून मालकापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांना, संबंधित रिक्षा मनपा मुख्यालयासमोरून चोरीला गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपीने वाहन चोरी करून त्याचाच वापर अपहरणासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसानी तपासावर विशेष लक्ष ठेवले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सिटी चौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आणि राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तपास करीत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी समन्वयाने कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. चिमुकलीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे संशयितांचे छायाचित्र दाखवून ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.






