एनसीपी अजित पवारांनी दिली नवाब मलिक यांच्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबईमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. तर शिवसेना ही सत्तेची परंपरा राखण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील मुंबईसाठी राजकीय चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईच्या निवडणुकीसाठी खास चर्चा करण्यात आली. यामधून 50 जागांवर अजित पवारांचा पक्ष नशीब आजमवणार आहे. तसेच मुंबई पालिका निवडणुकीचे नेतृत्व हे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे असणार आहे. भाजपच्या विरोधाला बगल देत नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीने मुंबईची जबाबदारी दिली आहे.
हे देखील वाचा : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने याला कडाडून विरोध केला आहे. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करणार नाही, असे मत भाजप नेत्यांनी मांडले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा
त्यासोबतच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीत राहून कमी जागा घेण्यापेक्षा स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवून द्यावी, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतील अल्पसंख्याक मतांवर लक्ष केंद्रित करता येईल. जे महायुतीत राहिल्यास कठीण होऊ शकते, असेही बोललं जात आहे.
हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
मुंबईमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष तयारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा हात धरण्याचा निर्णय घेतला आहे. तर कॉंग्रेस पक्षाने महाविकास आघाडीमधून बाहेर पडत मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी देखील मलिकांना संधी देत भाजपची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष राजधानी मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.






