शरद पवारांवर निशाणा साधणाऱ्या संजय राऊतांवर जितेंद्र आव्हाडांचा घणाघात (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत हे चर्चेमध्ये आले आहेत. शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. महादजी शिंदे या पुरस्कार देत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या राजकारणाचे आणि कामाचे कौतुक केले. मात्र यामुळे ठाकरे गट नाराज झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी देखील याला दुजोरा दिला. या प्रकरणावर शरद पवार गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “शरद पवार हे असे राजकारणी आहेत ज्यांच्यात सूड, द्वेष भावना असं कधी निर्माणच होत नाही. आम्हालाही त्यांचा कधी कधी राग येतो. असं वाटतं की शरद पवार हे असं का करतात? पण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत जिथे शरद पवार जातील असं वाटत नव्हते तिथे शरद पवार जातात. ज्या माणसांनी शरद पवारांच्या राजकारणाची अडचण केली, पक्ष पळवला त्यांच्याबाबतही शरद पवारांच्या मनात असूया नाही. खरंतर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. खोट्या केस करा, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवा असं राजकारण कधीही शरद पवार यांनी केलं नाही. मागच्या पाच ते दहा वर्षांत सुरु झालंय ना ते शरद पवारांच्या मनातही कधी येणार नाही,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “शरद पवार कुठल्या मंचावर जातात? याचा विचारही कुणी करु नये. ते राजकारणात कप्पे करतात. राजकीय कप्पा आणि सामाजिक कप्पा वेगळा आहे. मी बाबासाहेब पुरंदरेंबाबत वक्तव्य केलं होतं तेव्हा आमच्या पक्षातल्या अनेक लोकांनी मला सांगितलं माफी माग म्हणून. मी शरद पवारांना फोन केला मी विचारलं मी चुकलो का? त्यावर शरद पवार चटकन म्हणाले या विषयात तुझा अभ्यास आहे. त्यानंतर तू भूमिका घेतली आहे. यात कुठेही तुझं काही चुकलेलं नाही. हे पवार आहेत. शरद पवार हे रसायन समजून घेण्यासारखं आहे. विश्वासघातकी वगैरे शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. लढायची वेळ येईल तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे शरद पवार सामोरे जातात हे लक्षात ठेवा. राजकारण म्हणजे सूड, द्वेष, संपवून टाका वगैरे असं काही नसतं,” असे देखील स्पष्ट मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांवर टीका केली होती. संजय राऊत म्हणाले होते की, “कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.