अजित पवारांकडून मतं मागताना निधीचा उल्लेख होत असल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली (फोटो - सोशल मीडिया)
तुम्ही आम्हाला मतदान करा, आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. मी तुम्हाला निधी देतो, नाही दिला तर मी पण निधीवर काट मारणार, तुमच्याकडे मत, माझ्याकडे निधी,’ अशी धमकीच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचार सभेत देऊन टाकली. तर, भोर येथेही त्यांच्या पक्षाच्या नेत्याने ‘तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत,’ असे विधान केले. यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेकदा मते दिल्यानंतर निधी दिला जाईल असे विधान केले जात आहे. यावर मते मागताना कामांवर नाही तर निधींवर मागितली जात आहेत आणि हे चांगले नाही, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले शरद पवार?
जेष्ठ नेते शरद पवार यांनीराज्यामध्ये निधीवरुन सुरु असलेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. शरद पवार म्हणाले की, “सध्याच्या राजकारणामध्ये जी काही चढा-ओढ सुरु आहे. त्यामध्ये किती पैसे द्यायची याची चढाओढ सुरु आहे. मतं मागताना केलेल्या विकास कामांवर मतं मागितली जात नाही. मी पैसे देईल आणि निधी देईल अशा गोष्टींवर सध्या मतं मागितली जात आहेत. पण ही गोष्ट अजिबात चांगली नाही. शेवटी अर्थकारण आणुन निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टीकोन असेल तर त्यावर न बोललेलं बरं,” असे विधान जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.
अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात
पुढे शरद पवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची व्यथा मांडली. ते म्हणाले की, “अतिवृष्टीनंतर ज्यांची जमीन वाहून गेली, त्यांना काही ना काही आर्थिक मदत करून पुन्हा उभं राहण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती मदत करण्याची गरज होती. यातच आता राज्य सरकारने असं धोरण ठरवलंय की त्यांच्या कर्जाच्या वसुलीला एका वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. एक वर्ष कर्जाच्या वसुलीला स्थगिती देणं हे तात्पुरतं उपयोगी पडेल. पण त्यांची गरज भागणार नाही. मला असं वाटते की शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं ते पाहता त्यातील काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती. तसेच काही रक्कमेवर व्याज माफ करून दिर्घ हप्ते दिले असते तर शेतकऱ्यांची अधिक मदत झाली असती पण सरकाने दिलेली मदत ही पुरेशी आहे, असं मला वाटत नाही,” असेही स्पष्ट मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांबाबत मांडले.






