अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जमीन घोटाळ्याप्रकरणी हाय कोर्टामध्ये जाणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
कोरेगाव पार्क येथील जमीनीच्या घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. तसेच जोरदार टीका झाल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे सादर केल्यानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र यावर अजित पवार यांनी सज्जड पुरावे असतील तर हायकोर्टामध्ये जा, असे म्हणत थेट चॅलेंज दिले. अंजली दमानिया यांनी हे चॅलेंज स्वीकारले आहे. त्यामुळे आता पुण्यातील जमीन घोटाळ्याचे प्रकरण हे थेट हायकोर्टामध्ये जाणार आहे.
‘महाराष्ट्रातील जनता निराश, राज्य सध्या चुकीच्या दिशेला चाललंय’; सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, मुंढवा जमीन घोटाळा हा सरळसरळ “ओपन अँड शट केस” असून संपूर्ण व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित असल्याचा आरोप मी पुन्हा करीत आहे. एलओआय, सेल डीड, ताबा प्रक्रिया—सर्व काही खोटे होते, आणि या प्रकरणात कलेक्टर ते पालकमंत्रीपर्यंत सहभाग होता, अशी माझी ठाम भूमिका आहे. पार्क कंपनीने हा व्यवहार केला असला तरी त्यांना राजकीय संरक्षण मिळाले, आणि त्यामुळेच हे घोटाळे निर्भयपणे घडला असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “मी पुढील आठ दिवसांत हायकोर्टात याचिका दाखल करणार असून, कोणत्याही सरकारला चौकशी थांबवण्याचा अधिकार नसल्याचे आणि तो फक्त न्यायालयाकडे असावा, ही मागणी करणार आहे. सिंचन घोटाळ्यासारखीच ही लढाई मी शांतपणे पण ठामपणे लढवणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या पक्षांचेच कार्यकर्ते खंडणी, धमक्या आणि गुंडगिरीची भाषा वापरत असतील, तर त्यांच्याकडून वेगळ्या संस्कारांची अपेक्षा नाही. तसेच निवडणुकांतील पैशांचे वाटप हे लोकशाहीला घातक असून, या प्रकरणातही काही राजकीय नेत्यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.






