ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची घोषणा (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी हा पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भाजप हा आता उद्योजकांचा पक्ष झाला असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
बारामती दौऱ्यावर आल्यानंतर प्रा. हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसींना न्याय देण्यासाठी त्यांचा हक्काचा पक्ष असावा, यासाठी आपण ओबीसी जनता पक्षाची स्थापना करणार असून, आगामी निवडणूक ओबीसी जनता पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे. ओबीसी ही भाजपची परंपरा आहे, म्हणून त्यांनी ओबीसींची मते घेतली. मात्र, भाजपचा मूळ ढाच ओबीसींचा राहिला नसून तो उद्योजकांचा झाला आहे. ओबीसींच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण या पक्षाची स्थापना करणार आहोत.
सध्या ओबीसींच्या बाजूने खासदार, आमदार अथवा सत्ताधारी व विरोधक देखील बोलायला तयार नाहीत. पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसींच्या बाजूने कोणीही बोलले नाही. राज्यातील ओबीसींच्या प्रश्नावर एकही आमदार जर अधिवेशनात बोलत नसेल तर हे मोठे दुर्दैव आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत देखील कोण बोलत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील ६० % ओबीसींनी करायचे काय?, असा सवाल व्यक्त करत हाके म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या सत्तेचा राजमार्ग आमच्या वाड्यावस्त्यावरून जात असेल, मात्र प्रत्यक्षात ओबीसींच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नसेल तर ओबीसींना न्याय देणारा कोण नाही, अशी भावना ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी स्वतःच्या प्रश्नावर स्वतः काम करतील. याच दृष्टिकोनातून आपण ओबीसी जनता पार्टीची स्थापना करणार असल्याचे हाके यांनी यावेळी सांगितले. यावेळी बापूराव सोलनकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी
कोकणातील महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता मंत्री योगेश कदम यांनी उडी घेत ‘आता नो कॉम्प्रोमाईज’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.






