पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा
Pune Ward structure: गेल्या चार-साडेचार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली असून त्यासाठी प्रक्रिया राबवण्यासही सुरुवात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तर त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नियोजनाला सुरुवात झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका या २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ साडेतीन वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर प्रशासकांकडे कारभार सोपविण्यात आला होता. राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमले असून सध्या त्यांच्याच माध्यमातून पुणे महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे.
राज्यातील महापालिकांचा कार्यकाळ संपल्यापासून महापालिकेच्या निवडणुका घेण्याची सातत्याने मागणी केली जात होती. पण गेल्या चार साडेचार वर्षांपासून निवडणूका रखडल्या होत्या. त्यावर निर्णयही होत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे.
प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला मान्यता दिली आहे. अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना (वॉर्ड गॅझेट) सोमवारपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. या अधिसूचनेनंतर महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यात कोणते बदल करण्यात आले आहेत, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता या अधिसूचनेकडे लागले आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभागरचनेनुसार होणार असून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. महापालिकेने प्रारूप प्रभागरचना तयार करून प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर चार ४ सप्टेंबर पर्यंत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. प्रारूप प्रभागरचनेवर तब्बल १० हजार हरकती आल्या होत्या त्यात ८२८ नागरिकांनी सुनवणीस प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या हरकती नोंदवल्या. या प्रकरणात वरिष्ठ सनदी अधिकारी व्ही.पी, राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आवश्यक बदल करून अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. त्यास आयोगाची मान्यता मिळाल्याने आता पुढील निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकती आणि सुनावणीनंतर शासनाने सुमारे १४ ते १५ बदल केल्याची चर्चा आहे. यामध्ये ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, ८ ते १० प्रभागांच्या हद्दींमध्ये फेरबदल झाले आहेत. विशेषतः उपनगरांतील काही प्रभागांच्या सीमारेषांमध्येच मुख्य बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, अंतिम अधिसूचना (वॉर्ड गॅझेट) प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रभागांचे अधिकृत स्वरूप स्पष्ट होणार आहे.