Radhakrishna Vikhepatil On Sharad Pawar And Ajit Pawar Comes Together
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर आनंदच…; राजकीय चर्चांनंतर नेत्यांनी व्यक्त केले समाधान
शरद पवार यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले आहे. यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सूचक विधान केले आहे. तसेच अनेक नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अजित पवार व शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरु (फोटो - सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथ झाली. यामध्ये अजित पवार यांनी त्यांच्या काका शरद पवार यांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीचे देखील शिवसेनेप्रमाणे दोन गट निर्माण झाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली होती. यानंतर आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होताच गट एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत विधान केले होते. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबतचा अधिकार हा सुप्रिया सुळे यांना असल्याचे सांगितले. याबाबत गुरुवारी सकाळी पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड मध्ये सांगितलं की, कालच्या मुलाखतीत मी काय बोललो मला माहीत नाही. पण पवार एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावे. राष्ट्रवादी पक्ष उभा करताना आज जे लोक बाजूला गेले आहे ते सगळे एकत्र होते त्यां सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही.आज माझे सगळे खासदार एक मताचे आहेत.आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते कारण आमदारांना मतदार संघाची कामे असतात म्हणून ते अस्वस्थ असतात.मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असेही यावेळी पवार म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्यात आहेत. याबाबत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असेल आनंदच असल्याचे सांगितले. सिंचन भवन येथे आयोजित आढावा बैठकीनंतर डॉ विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे. आणि आता जर ते एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घ्यावा असे काही नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण करावं, किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादी विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. दरम्यान त्यांची विचारधारा नेमकी काय आहे हे त्यांनाच विचाराव लागेल कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे हेच मला माहित नाही असे राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर ताकद वाढेल
सिंचन भवन येथील बैठकीत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते, त्यांना शरद पवार यांच्या विधनाबाबत विचारले असता त्यांनी सोलापूरचे आम्ही चार आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तसेच पवार साहेबांना याविषयी बोलणे झाले होते. अजित पवार यांच्यावर टीका करूनही, त्यांनी मला नेहमी विकासकामांत साथ दिली. माझ्या मतदारसंघात काम केली, पाणी दिले. माझ्या मतदार संघात कामे करताना त्यांच्या मनात कुठेही द्वेष नाही दिसला नाही. मतदारसंघात काम असतात, अडचणी असतात, त्यामुळे सरकारची गरज असतेच असे सांगून जानकर यांनी शेवटी पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असे सांगितले.
Web Title: Radhakrishna vikhepatil on sharad pawar and ajit pawar comes together