Assembly Election 2024: राहुरीत तनपुरेंना धक्का; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ
अहिल्यानगर /गिरीश रासकर : राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्याच यादीत शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये नगर जिल्ह्यातून शिवाजी कर्डिले यांच्यासह आणखी चार नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. शिवाजी कर्डिले यांचे नाव जाहीर झाल्यानंतर राहुरी मतदार संघामध्ये कर्डिले विरुद्ध तनपुरे असा सामना राहणार असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी चाचा तनपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून कर्डिलेंना धक्का दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून विखे आणि कर्डिलेंनी तनपुरे व थोरात यांना शह दिल्याचा तालुक्यात चर्चा रंगत आहे.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर तालुक्यात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर कर्डिले यांनी आपल्या अनुभवाचा पुन्हा उपयोग करण्यास सुरुवात केली असून आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत तालुक्यातील नाराज पदाधिकाऱ्यांना तसेच सहकाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या सोबत घेण्यास कर्डिले यशस्वी ठरत आहेत.
हेही वाचा-‘इंडिया’ ब्लॉकचं ठरलं ! उत्तर प्रदेशात सायकल चिन्हावर लढवणार पोटनिवडणूक
नुकताच शिवाजीराव कर्डिले व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गाढे यांनी भाजपात प्रवेश केला. राहुरी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाल्याने राहुरी विधानसभेत भाजपाला तसेच कर्डीलेंना मोठी ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा-Assembly Election 2024 : महाविकास आघाडीचा आता नवा फॉर्म्युला, मित्रपक्षांना काय मिळालं? वाचा सविस्तर
या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीत सक्रिय असलेले धनराज गाडे आणि भास्करराव गाढे यांनी आज भाजपात प्रवेश केल्याने राहुरीत राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलं आहे.