Thackeray Brothers manifesto: मुंबई महापालिकेसाठी आज ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा; कोणते आहेत १६ मुद्द्यांत मुंबईचा विकास
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधुंकडून १६ मुद्द्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच संयुक्तपणे या १६ मुद्द्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यात काही मुंबईच्या विकासाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या. ठाकरे बंधूंच्या युतीच्या २२७ उमेदवारांसमोर आदित्य आणि अमित ठाकरेंनी हे प्रेझेंटेशन दिले होते. या सगळ्या घडामोडींनंतर आज मुंबईसाठी ठाकरे बंधूं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकं काय असेल, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. या निमित्ताने राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्रितपणे सहा प्रचारसभा घेणार आहेत. दुसरीकडे, आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही प्रचार दौरा सुरू होणार आहे. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात वीजबिल सवलत, बेस्ट बसचे दर, पाळणाघर सुविधा तसेच शासकीय महाविद्यालयांबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात अनेक लोकाभिमुख आणि विकासात्मक मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) माफ करण्याचा प्रस्ताव असू शकतो. तसेच १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणाही अपेक्षित आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव असून, कोळी महिलांसाठी ‘माँसाहेब किचन’मधून केवळ १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जाहीरनाम्यात असू शकतो. तरुणांसाठी रोजगार सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची घोषणाही करण्यात येण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने बेस्ट बसचे तिकीट दर ५ ते १० रुपये तसेच १५ ते २० रुपये या दरम्यान स्थिर ठेवण्याचा प्रस्ताव अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर उभारण्यात येणार असून, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात येतील, असा मुद्दाही समाविष्ट असू शकतो.
याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य ग्रंथालय उभारण्याची घोषणा, प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती, मुंबई महानगरपालिकेतर्फे मोफत पार्किंग सुविधा, तसेच बीपीटीच्या १,८०० जागांवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर विकासकामे करण्याचा प्रस्ताव जाहीरनाम्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, आज राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात येणार आहेत. आजच ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर केला जाणार असून, त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच दोन्ही ठाकरे बंधू मुंबईतील शाखा-शाखांना भेटी देणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. मनसेच्या तसेच शिवसेनेच्या शाखांना भेट देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करणार आहेत. सभा आणि प्रचार दौऱ्यांमधून वेळ मिळेल त्यानुसार मुंबईतील विविध शाखांना भेटी दिल्या जातील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.






