खेड : नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीचे वारे वाहत असून स्थानिक स्वराज्य संस्था देखील सज्ज झालेत. अशातच आता कोकणात मोठा गाजावाजा करत शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांनी गुरूवारी 13 नोव्हेंबर रोजी खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याला चोवीस तास होत नाही तेच या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागा देत बोलणी केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज14 नोव्हेंबर दापोली येथील कार्यालयात बैठक घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले असून ही एकतर्फी केलेली युती मान्य नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना कळविलं आहे. त्यामुळे दापोलीतील महायुतीतील अंतर्गत वाद समोर आले आहेत.
बुधवारी 12 नोव्हेंबर सकाळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी भाजपला नगरसेवक पदाच्या तीन जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले. मात्र ही घोषणा करताना भाजपला विश्वासात घेतले का असा प्रश्न उपस्थित केला गेला. जर आमच्या एकाही नेत्याला याबाबत काहीच माहिती नसेल तर नक्की ही युती कोणी केली? असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
आज सकाळपर्यंत या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या खेड, दापोली, मंडणगड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली कार्यालयात बैठक घेत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रवेश केल्यावर भाजपची खेड मधील ताकद वाढली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सन्मानपूर्वक जागा वाटप करावे अशी भाजपच्या पदाधिकारी यांची इच्छा होती मात्र शिवसेनेने केवळ 3 जागा भाजपला देऊ केल्या आहेत. नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपची एक प्रकारे चेष्टाच शिवसेनेने केली असल्याचा एकंदरीतच समज होत आहे.
निवेदनात
रत्नागिरीतील या दोन्ही गटात झालेल्या अंतर्गत वादांमुळे भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निदेदन दिलं. त्या निवेदनात असं म्हटलं आहे की, ड नगर परिषद पूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या बळावर येण्याची स्थिती व वातावरण निर्माण झाले आहे. आम्हा कार्यकर्त्यांचा महायुती अथवा युती दोघांनाही विरोध नाही.माजी आमदारसूर्यकांतजी दळवी यांची खेड नगरपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. खेड शहरात बैठका झाल्या, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या, मात्र आम्हा कोणाही पदाधिकऱ्यांना माहिती नसताना व कोणतीही कल्पना न देता जागा वाटप झाले. त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सन्मानाने युती आम्हा सर्वांनाच मान्य आहे. मात्र खेड नगरपरिषद आपण स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना आपल्याला केवळ तीनच जागा मिळणे हे संघटना म्हणून अत्यंत चुकीचे आहे. रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील दापोली विधानसभेत मोठा राजकीय असमतोल निर्माण झाला आहे व त्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. असं नमूद केलं आहे.






