खेड : निवडणूकीचे वारे वाहण्यास आता सुरुवात झाली आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तारूढ महायुतीतील घटकपक्ष — शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) — यांनी खेड नगर परिषद निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, महाविकास आघाडीच्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी व घटक पक्षांची देखील आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी येथे नगराध्यक्षपदासाठी मात्र मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
मात्र, महायुतीचा फॉर्म्युला ठर ल्यानंतरही अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. सोमवारी, दि. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, आगामी काही दिवसांत सर्वच पक्ष आपापले पत्ते उघडतील, अशी शक्यता आहे.यंदा खेड नगर परिषदेच्या क्षेत्रात तीन नवीन जागांची वाढ झाली असून, आता 10 प्रभागांमध्ये 20 नगरसेवकांची निवड होणार आहे. यंदाचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी निर्माण झाली आहे.
अलिकडेच मनसेतून बडतर्फ झालेले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व त्यांचे सहकारी भाजपमध्ये दाखल झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणात मोठा बदल झाला. शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल का, याबाबत असलेला संभ्रम मुंबईतील बैठकीनंतर दूर झाला असून, तीन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे.अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात वैभव खेडेकर यांनी “खेड नगर परिषदेत भाजपचाच झेंडा फडकणार” असा ठाम दावा केला होता. परंतु त्याच बैठकीत चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतूनच लढवण्याचे संकेत दिल्याने स्वबळाच्या आरोळीवर अप्रत्यक्षरीत्या पाणी फिरले. अखेर मुंबईत ठरलेल्या निर्णयामुळे महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
दरम्यान, महायुतीच्या रणनीतीला तोलून धरण्यासाठी महाविकास आघाडीचेही प्रयत्न सुरू आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात आघाडीची चर्चा सुरू आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी अपक्षांना पाठिंबा देऊन रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
महायुती असो वा महाविकास आघाडी — दोन्ही गटांकडून नगराध्यक्षपदासाठीच्या संभाव्य महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. पण अधिकृत घोषणा कोणीही केलेली नाही. उमेदवारी अर्जाचा कालावधी सोमवारपासून सुरू होत असल्याने, पुढील आठवडाभरात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.महिला आरक्षणामुळे सर्वच पक्षांकडून नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेड नगर परिषदेची निवडणूक ही यंदा महिलांच्या नेतृत्वाचा कस पाहणारी ठरणार असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.






