अखेर दिलजमाई ! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार एकत्रित निवडणूक; भाजपची गोची (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी कोणत्याही निवडणुकीत एकत्रित दिसली नाही. असे असताना आता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवणार असून, समन्वयाने जागा वाटपाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपालिका, नगरपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजप मोठा पक्ष असल्याने या पक्षाने आपला स्वतः प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता चंदगड तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले होते.
हेदेखील वाचा : Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा उत्साह; नामनिर्देशन प्रक्रिया झाली सुरू
यामध्ये माजी आमदार राजेश पाटील व राष्ट्रवादीच्या सक्रिय नेत्या नंदा बाभुळकर यांच्याशी बोलणी करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार आहेत.
शिवाजी पाटील यांनी विरोधात लढवली होती निवडणूक
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील तर अपक्ष नंदा बाभुळकर यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये ते कमळ चिन्हावर निवडून आले असून, सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.
अस्तित्त्व दाखवण्यासाठी युती
तर नुकतेच आप्पी पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपची ताकद वाढली असल्याची चर्चा होत असताना आता राष्ट्रवादीने आपले अस्तित्व दाखवण्यासाठी युती केली असल्याने भाजपला मात्र या ठिकाणी आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे.
हेदेखील वाचा : Local Body Election 2025: छत्रपती संभाजीनगर नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम, नामनिर्देशन अर्ज विक्री आजपासून सुरु






