अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागा झाल्या होत्या. यासाठी महायुतीकडून नावे जाहीर करण्यात येणार आहे. या पाच जागांसाठी भाजपच्या तीन, शिंदे गटाच्या एक आणि अजित पवार गटाला एक जागा देण्यात आली होती. अजित पवार यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. अनेक इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळवी देखील करुन ठेवली होती. मात्र अजित पवार यांनी विधान परिषदेच्या एका जागेसाठी संजय खोडके यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खोडके हे अमरावतीचे नेते असून त्यांच्या पत्नी देखील राजकारणामध्ये असून आमदार आहेत.
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्याआधी भाजपने आपल्या तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अजित पवार यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू होती. दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाची बैठक पार पडली. अजित पवार यांनी संजय खोडके यांना संधी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय खोडके यांना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांच्य पत्नी सुलभा खोडके या देखील अमरावती शहर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहे. 2017 मध्ये संजय खोडके हे विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात पराभूत झालेले असताना 2019 च्या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघाऐवजी अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. 2019 च्या निवडणुकीत सुलभा खोडके विजयी झाल्या.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. त्यानंतर, सुलभा खोडके यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते प्रवेश केला. 2024 मध्ये सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर आता संजय खोडके यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या.