शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडून उच्च स्तरीय चौकशीकरण्याची भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मागणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Sharad Pawar Marathi News : मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन आणि निकाल होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही त्यावरुन राजकारण तापले आहे. कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मतचोरी झाली असल्याचा आरोप केला आहे. यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना दोन माणसे भेटून निवडणुकीमध्ये जागा मिळवून देण्याबाबत वक्तव्य करत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर शरद पवारांनी हा दावा केल्यामुळे शरद पवारांवर टीका केली जात आहे. दरम्यान, त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यासोबत एकजण डील करण्यासाठी आला असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात एक बॉम्ब सोडला. मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते असे शरद पवारांनी सांगितले. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. यानंतर आता शरद पवार यांच्या वक्तव्याची शाहनिशा झाली पाहिजे आणि त्यांची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. याबाबत ते निवडणूक आयोगाला देखील पत्र लिहिणार असल्याचे प्रशांत बंब यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार प्रशांत बंब म्हणाले की, राज्याचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, त्यांच्याकडेही असेच लोक आले होते, दानवे यांनी त्यांना त्वरित पोलिसांच्या हवाली केलं. तसं शरद पवार यांनी दुसऱ्या रूममधून पोलिसांना फोन लावून त्या दोन लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. मग त्यांनी तसं का केलं नाही ? असा सवाल बंब यांनी विचारला. मला वाटतं, त्यांची एक उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.
या उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचा दावा देखील प्रशांत बंब यांनी केला. शरद पवार ईडीकडे जसे स्वतःहून गेले तसे या चौकशीला शरद पवार यांनी जावं असंही बंब म्हणाले. शरद पवार यांच्याबरोबर राहील गांधी यांच्याही कार्यालयाची चौकशीची मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा
शरद पवार यांच्या दाव्यावर भाजप नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचा दावा म्हणजे सलीम-जावेदच्या गोष्टी आहेत. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? माझी अपेक्षा होती की, हे देशातले मोठे नेते आहेत. कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पोलिसांना कळवायला हवं. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. कारण निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं चार वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना ओपन चॅलेंज दिले आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणीही ईव्हीएम हॅक करू शकले नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.