शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांचे लक्ष 'सर्वोच्च' निर्णयाकडे
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण अनेक महिन्यांपासून कोर्टात प्रलंबित आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना आता या प्रकरणासह धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (दि.१२) स्लॉट नंबर १९ वर सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने निश्चित केले.
२०२२ मध्ये शिवसेनेत उद्भवलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने ३७ आमदारांच्या बहुमताच्या आधारावर सत्ता मिळवली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव व धनुष्यबाण चिन्ह दिले, तर ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळाले. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जानेवारी २०२४ च्या निर्णयाला आव्हान देत शिंदे व १६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी केली. नार्वेकर यांनी शिंदे गटाला ‘खरी शिवसेना’ घोषित करत अपात्रता याचिका फेटाळल्या, ज्याला ठाकरे गटाने ‘घोर अन्याय’ म्हटले.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Elections: सोलापूर महानगरपालिकेचे बहुप्रतिक्षित आरक्षण जाहीर; इच्छुकांची ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी अवस्था
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी आहे. गद्दारी करून बाहेर पडलेल्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास देण्याच्या निर्णय प्रक्रियेत संविधानाच्या कशा प्रकारे चिंधड्या उडवल्या गेल्या, यावर सुप्रीम कोर्टात फैसला होईल, असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही झाली होती सुनावणी
यापूर्वीही, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाने आव्हान दिले आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाच्या आमदाराला अपात्र केले नसल्याने दोन्ही गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात या दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज होणार आहे.






