देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या राजकीय टीकेवर सुषमा अंधारे यांनी दिले चोख प्रत्युत्तर. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये सामील झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे नाव न घेता खडेबोल सुनावले. त्यानंतर आता विरोधकांनी देखील पलटवार केला आहे. ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांचा लाडकी भावजय असा उल्लेख करत टीका केली आहे.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
नागपूरमधील कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांनी राजकीय टीका केली. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत महायुती सरकारला पुन्हा एकदा निवडून द्या, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. पुढे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या प्राथमिकता काय? तर ती असते माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपण स्त्रिया हे म्हणू शकतो कारण कुटुंबाचा आपण भाग आहोत. पण जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की माझं कुटुंबच माझी जबाबदारी तर तो आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी व्हिजन असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत. आपल्या सगळ्यांची प्रगती त्यात आहे. असं झालं तर मग असे नेते येणार नाहीत ज्यांना आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. ज्यांना लोकांची काळजी आहे असे लोक पुढे आले पाहिजे,” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला होता. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
यावरुन आता विरोधातील महिला नेत्यांनी देखील टीका केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाले की, “अमृता वहिनी या आमच्या लाडक्या भावजय आहेत. त्या कधी-कधी खरं बोलतात. खरं तर एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून पुढे आणायचं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्तीचा लाभ स्वत:च्या पदरात पाडून घेतला, त्या सुनील तटकरेंना त्यांची मुलगी आदिती तटकरे यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस जे काही बोलल्या, ते एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यासंदर्भात आहे”, असा खोच टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
पुढे महायुतीवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “महायुती काहीही करायला गेली, की त्याचं उटलं होतं आहे. महायुतीच्या सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा गाजावाजा लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला, पण दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कोसळला. अशा एक ना अनेक घटना घडत आहेत. कारण त्यांची काम करण्याची नियत चांगली नाही. ते लोकाभिमूख काम करत नाही, तर मताभिमूक काम करतात. त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडमबाजी करतात,” अशी लोक अडचणीत येणं स्वाभाविक आहे”, अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.