जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकांच्या प्रचारावेळी सभेमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली (फोटो - ट्वीटर)
जम्मू – काश्मीर : केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व कॉंग्रेसमध्ये दोन्ही राज्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. आरोप प्रत्यारोप सुरु असून जोरदार राजकारण रंगलं आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठींचा दौरे वाढले आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी मंचावर असताना मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांची एकच धांदल उडाली.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आले होते. कठुआ जिल्ह्यातील जसरोटा येथे त्यांची सभा होती. ते मंचावर भाषण देण्यासाठी उभे होते. खर्गे मंचावरून जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. मात्र अवघ्या काही वेळामध्ये ते सावरले आणि त्यांची प्रकृती थोडी सुधारली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. अध्यक्ष खर्गे म्हणाले, “आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी 83 वर्षांचा आहे आणि इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवले जात नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन.” असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
हे देखील वाचा : राहुल गांधी खोटे बोलण्याची मशीन; अग्निवीर योजनेबाबत अमित शाहांचे काय म्हणाले?
पुढे मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. 10 वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की त्याने विकास आणला की नाही. पंतप्रधान फक्त इथे येऊन तरुणांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. सत्य हे आहे की या लोकांनी गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशातील तरुणांना अंधारात ढकलले आहे. याला खुद्द पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. लवकरच काश्मीरची विधानसभा रंगणार असून यामुळे राजकारण देखील रंगले आहे.
जब तक मोदी को नहीं हटाएंगे, तब तक मैं जिंदा रहूंगा।
आपकी बात सुनूंगा, आपके लिए लड़ूंगा।
pic.twitter.com/XEJ3Ym9auw— Congress (@INCIndia) September 29, 2024