सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वडेट्टीवारांना लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळेंचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे सांगितले आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसवरच सवाल उपस्थित केले. मित्रपक्षांना लक्ष्य करण्याऐवजी त्यांच्यासोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
“विजय वडेट्टीवार यांना कुठून पुरावे मिळाले? ते त्यांनी सांगावं,” अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत ते सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’
काँग्रेसला मित्रपक्षाची गरज नाही का, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी नेमकी कोणाची ‘सुपारी’ घेतली आहे, हे स्पष्ट करावे, अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी केली.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा आपला हेतू नव्हता, असे स्पष्ट करत त्यांनी या उल्लेखाबद्दल खेद व्यक्त केला.
मात्र, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख मागे घेतला असला तरी ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ओबीसी प्रमाणपत्राचा वापर करून सत्तेचा लाभ घेणे आणि त्याचवेळी ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करणे योग्य नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. आपला लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील हा वाद महत्त्वाचा ठरला आहे. वडेट्टीवारांच्या स्पष्टीकरणानंतर या वादावर आता पडदा पडतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






