सुप्रिया सुळेंना डॉक्टरांचा 'व्हॉइस रेस्ट'चा सल्ला, 1-2 आठवडे भाषण-मुलाखती टाळणार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. घशात सूज आल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्णपणे आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या काही काळ सार्वजनिक भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली असता घशात सूज असल्याचे निदान झाले. उपचाराचा भाग म्हणून त्यांना ‘व्हॉइस रेस्ट’ आणि ‘व्हॉइस थेरपी’चा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी ही परिस्थिती समजून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सुप्रिया सुळे म्हणाली, “माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपाय म्हणून मी ‘व्हॉइस थेरपी’ घेणार आहे आणि पुढील १-२ आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. आपण ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”
Just met Dr. Milind Kirtane regarding my throat and voice. He has diagnosed a little swelling in my throat and has advised complete voice rest. I will be undergoing voice therapy, and have been advised to avoid speeches, interviews, and prolonged speaking for the next 1/2 weeks.… — Supriya Sule (@supriya_sule) July 18, 2026
20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा आरोग्यविषयक अपडेट समोर आला आहे. काही दिवस त्या सार्वजनिक व्यासपीठांवरून बोलणार नसल्याने पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी इतर खासदारांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी..,’, रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरेंचं मोठं विधान
अलीकडेच सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केला होता. तसेच या विषयावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. आता मात्र आरोग्याच्या कारणास्तव त्या काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार असून उपचारानंतर नियमित कामकाजात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






