शिवसेनेवरील टीकेमुळे सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंवर अब्रू नुकसानीचा दावा केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे या चर्चेत आल्या आहेत. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी केलेल्या टीकेवरुन राजकारण रंगले आहे. यामध्ये नीलन गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सिडिजच्या टीकेवरुन आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
नीलम गोऱ्हे यांनी दोन मर्सिडिज दिल्या की ठाकरे गटामध्ये पद मिळते असा दावा केला होता. यावरुन आता राजकारण रंगले आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. त्यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे. महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहेत. सबब मी, सुषमा अंधारे पक्षाची प्रवक्ता आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुषमा अंधारे यांनी यापूर्वी देखील नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “नीलम गोरे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं..? एखादी कादंबरी, त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ, ललित लेखन, कवितासंग्रह, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह… त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली…?? हे सगळं विचारण्याचे कारण नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनामध्ये नीलम गोरे यांची एक मुलाखत झाली…!! राजकारण्यांना बोलावले ही साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकता ही झाली आहे. शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही नामी संधी असते. त्यामुळे शासकीय खर्चाने होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची संधी सोडतील त्या नीलम गोऱ्हे कसल्या?” असा सवाल उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता.