शरद पवारांचे साताऱ्यात आगमन होताच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाची रंगली चर्चा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी तसेच रयत मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीसाठी गुरुवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले. पवारांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा रयत कौन्सिलच्या बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यात येत असून, पवार-काका पुतणे पुन्हा एकत्र येणार आहे.
शरद पवारांनी एका मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासंदर्भात पुढील पिढीने निर्णय घ्यावा, त्या निर्णय प्रक्रियेपासून मी काहीसा बाजूला आहे, असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा रात्री उशिरापर्यंत रंगली. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी मान्यवरांनी सातारा सैनिक स्कूलच्या हेलीपॅडवर शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पवार लगेच शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.
बंद दरवाज्याच्या आड रयत मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीचा पूर्व आढावा यावेळी घेण्यात आला. रात्री उशिरांच्या चर्चेमध्ये शशिकांत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार आणि जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांनी पवारांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्यासंदर्भात पवारांकडे आग्रह धरण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
स्थानिक निवडणुकांत ताकदीने उतरावं
सातारा जिल्ह्यातील दहा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याकरता राष्ट्रवादीने ताकदीने उतरावे, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राजे गटाचे प्राबल्य असणाऱ्या सातारा नगरपालिकेत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने उतरावे, असा आग्रह धरला गेला. शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत योग्यवेळी आपण निर्णय घेऊ, असे सर्वांना आश्वस्त केले.
…त्या निर्णय प्रक्रियेपासून मी थोडासा बाजूला
साताऱ्यात दाखल होण्यापूर्वी एका वाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा प्रश्न पवारांना विचारला गेला होता. त्यावर पवार म्हणाले, त्या निर्णय प्रक्रियेपासून मी थोडासा बाजूला आलो आहे. याबाबतचा निर्णय पुढील पिढीने घ्यावा, असे सूचक वक्तव्य करत पवारांनी पुन्हा एकदा राजकीय निवृत्तीचे संकेत दिले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.