उद्धव ठाकरेंकडून बंडखोरांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पुणे मुंबईसह 29 महापालिकांसाठी निवडणूका होत आहेत. यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मूदत देखील संपली आहे. यावेळी आठ वर्षानंतर पालिका निवडणूका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी होती. तसेच युतीच्या समीकरणामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला. मात्र आता पक्षामध्ये बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर शिवसेना ठाकरे गटाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे. पक्षाचे तिकीट न मिळाल्यानंतर देखील या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर देखील अर्ज मागे न घेतल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदर नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे. यामध्ये अनिल परब यांच्या जवळच्या नेत्याचा देखील समावेश आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : ‘निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधलेला अन् राहुल नार्वेकर…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सडकून टीका
मातोश्रीवरुन अनेकदा सूचना येऊन देखील आणि नेत्यांनी मनधरणी करुन देखील अर्ज मागे न घेतल्यामुळे या उमेदवारांना पक्षातून काढून टाकण्यात आले. यामध्ये मुंबईतील प्रभाग क्र. ९५ मधील शेखर वायंगणकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहेत. वायंगणकर हे पक्षाचे विधान परिषद आमदार आणि ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, प्रभाग ९५ मध्ये पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे अखेर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
दरम्यान, ठाकरे गटाने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. यामध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि प्रभागांची नावे समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांना अधिकृत उमेदवारी (AB Form) दिली होती, त्यांच्या विरोधात या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला. वारंवार सांगूनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. एकाच पक्षाचे दोन उमेदवार उभे राहिल्याने शिवसेनेची मते विभागली जातात. याचा थेट फायदा भाजप किंवा शिंदे गटाला होऊ शकतो. हे नुकसान टाळण्यासाठी बंडखोरांना पक्षाबाहेर काढले गेले.
हे देखील वाचा : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा
| विभाग | प्रभाग क्रमांक | पदाधिकारी |
|---|---|---|
| मध्य मुंबई | ७४, ९५, १६९ | संदीप मोरे, मंदार मोरे, शेखर वायंगणकर, कमलाकर नाईक |
| दक्षिण मुंबई | १९७, २०२, २०३ | परशुराम (छोटू) देसाई, विजय इंदुलकर, दिव्या बडवे |
| ईशान्य मुंबई | १७०, १०९, १३१ | सोनाली म्हात्रे, संगीता गोसावी, नीता शितोळे |
| उपायुक्त विभाग १०-१४ | १४२, १४३, १५० | रोहिदास ढेरंगे, सदाशिव बालगुडे, विकी मोरे |
| कुर्ला-मानखुर्द | १५५, १४७, १८३ | आनंद इंगळे, विजय नागावकर, रोहित खैरे, गणेश खाडे |
| माहीम-वरळी | १८६, १८५ | गणेश सोनवणे, चेतन सूर्यवंशी, माधुरी गायकवाड, कमलेश वारीया |
| धारावी-दादर | १९३, २०७, २०८ | बाबू कोळी, रोहित देशमुख, मंगेश बनसोड |
| मुंबादेवी-कुलाबा | २१८, २२५ | नयना देहेरकर, आरती लोणकर, प्रवीण कोलाबकर |






