बुलडाण्यात काँग्रेस, भाजपमध्ये संघटनात्मक बदल; नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी (संग्रहित फोटो)
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात राज्यातील युवक कॉंग्रेस गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहे. सातत्याने घेत असलेल्या निर्णयाची राज्यात जोरदार चर्चा होत असून, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी जाहीर केलेल्या विस्तारित 276 जणांची कार्यकारिणी राष्ट्रीय समितीने 48 तासांतच आदेश जारी करत रद्द केली. यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कुणाल राऊत यांनी कुठलीही पूर्वपरवानगी न घेता तसेच प्रक्रिया पूर्ण न करता ही कार्यकारिणी घोषित केली, असा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पदमुक्त करण्यात आलेले केतन विकास ठाकरे यांना पुन्हा कार्यकारिणीत घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला. राष्ट्रीय सचिव तथा प्रदेश प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी कुमार रोहित आणि एहसान अहमद खान यांनीही याबाबत शिस्तपालन समितीला गांभीर्याने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राऊत यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कुणाल हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिंरजीव आहेत. याआधीही त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत.
कार्यकाळही वादग्रस्त
कुणाल राऊत यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. नियुक्तीपासून इतर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद व संघर्ष सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी प्रचारात व्यस्त असतानाही त्यांनी ठपका ठेवत अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तर, नागपुरात सरसंघचालकांच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनानंतर घाईगदींत 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले. काहींना निलंबितही केले.
चारा पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केलं
चार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडल्याने त्यांना राऊत यांनी कायमचे बडतर्फही करण्यात आले होते. तर, पुढील निवडणूक लढवायची असल्याने कुरघोडी करीत शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयर, केतन ठाकरे यांना हटविल्याचीही चर्चा आहे. यामुळेच शिवराज मोरे यास कार्याध्यक्ष नेमले होते. त्यांनी पुन्हा एकदा कोणत्याही अधिकाराशिवाय विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली. बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास राष्ट्रीय नेत्यांनी कार्यकारिणीची बैठक रद्द केली.