फोटो सौजन्य: pinterest
आषाढी वारी म्हणजे काय तर विठ्ठल, वारकरी, टाळ-मृदुंग, भजन- किर्तन आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष. या वारीचे विविध पैलू आहेत. पायी चालत वारी करणाऱ्या या भक्तांचा हा पंढरीला वास्वव्यास असलेल्या या राजाच्या सगळ्याच गोष्टी खास आहेत त्यातलीच खास गोष्ट म्हणजे त्याचा पोशाख. हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. फेटा , धोतर , खांद्यावर उपरण आणि गळ्यात तुळशीची माळ असा वारकऱ्याचा आणि त्याचा राजाचाही वेश काहीसा सारखा आहे. याच विठ्ठलाच्या पोशाखाची महती जाणून घेऊयात.
फेटा, धोतर, उपरणं हा पोशाखविठ्ठलाने स्वतः परिधान केलेला आहे, आणि यामागे एक अत्यंत रंजक आख्यायिका सांगितली जाते. पुराणकथेनुसार, भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. पुंडलिक गरिब असला तरी त्याची मातृपितृ भक्ती सर्वश्रेष्ठ होती. त्याची हीच भक्ती विठ्ठलाला प्रचंड भावली. आपल्य़ा भक्ताला दर्शन देण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाच्या दारात आला. मात्र आईवडीलांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलिकाला विठ्ठलाच्या येण्याचं भान राहिलं नाही. त्याने विठ्ठलाला थांबण्यास सांगितलं आणि वीटेवर उभं केलं. विठ्ठल हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभा राहिला, आणि आजही ‘विठ्ठलाला याच स्वरुपात भाविक पुजतात. म्हणून युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा अशी देखील विठ्ठलाची स्तुती केली जाते.
प्रत्येकाच्या मनामनात वसणारा हा देवही सरळसाधा आहे. डोक्यावर फेटा, कमरेला धोतर आणि गळ्यात तुळशीहार. वारकरी करी संप्रदायातील बरीच मंडळी ही शेतकरी आहेत किंवा त्यांची पार्श्वभूमी शेतीची असल्या कारणाने विठ्ठलाचा पोशाखही शेतकऱ्यांच्या पोशाखासारखाच मिळता जुळता आहे. असं म्हणतात की या पोशाखातून विठ्ठल असं सांगतो की, देव हा भक्ताचं आंतरितक रूप आहे. तो कोणत्याही शोभेच्या मागे नाही, तर साधेपणाच्या मार्गावर चालतो. विठ्ठल हेच सांगतो की भक्ती ही धन, संपत्ती, किंवा रेशमी वस्त्रांनी सिद्ध होत नाही, तर मनाच्या पवित्रतेने होते. देव हा भौैतिक सुखाचा नाही तर भक्ती, समर्पण आणि प्रेमाला भुकेला आहे. विठ्ठलाचा हा पोशाख म्हणजे साधेपणा, समता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. तो राऊळात मुर्तिस्वरुपात असला आत्म्याने तो प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात वास करतो.