Astro News: एका मराठी सिनेमातलं खूप छान वाक्य आहे. प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. शाळेत असताना सहलीला जाताना ते आता ट्रेकला किंवा फिरायला जाताना लांबच्या प्रवासाला पसंती देणारे खूप जणं आहेत. मात्र ज्योतिषशास्त्रात काही संकेत सांगितले आहेत ज्याचा अर्थ आज जाणून घेऊयात.
प्रवास आवडत असला तरी, बाहेर पडताना नकळत मनात प्रश्न येतातच प्रवास कसा होईल ? कोणत्या अडचणी तर येणार नाही ना ? सगळं व्यवस्थित होईल ना अशी धाकधूक कधी ना कधी मनात येतेच. त्याचबरोबर प्रवासात असे काही संकेत मिळतात जे शुभ किंवा सावध राहण्याचा अर्थ सांगतात याबाबत ज्योतिषशास्त्रात सविस्तर सांगितलं आहे. प्रवासात जाताना अशा काही घटना घडतात ज्यांना सहसा दुर्लक्ष करु नये असं शास्त्र सांगतं.
प्रवासाला निघतानाचे शुभ संकेत
परिक्षा असो नोकरीचा पहिला दिवस असो किंवा लांबचा प्रवास असो हातावर मोठी माणसं दही साखर ठेवतात. या दही साखरेची परंपरा खूप जुनी आहे. प्रवासाला निघतानाचा हा शुभ शकुन मानला जातो. आजकाल मोर सहसा कुठेही पाहायला मिळत नाही मात्र तुम्हाला प्रवासात कधी मोर दिसला तर तुमचा प्रवास आनंददायी होईल आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळेल, अशी मान्यता आहे.
रसत्याने जाताना गाय दिसणं हा ही शुभ शकून मानला जातो. गाईला देवासमान मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देव असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा गायीचं दर्शन होतं तेव्हा त्या 33 कोटी देवांनी आशिर्वाद दिला आहे असा त्याचा अर्थ होतो.
देवदर्शन होणे
प्रवासाला निघताना देवळाजवळून जाणे, देवाचे नाव ऐकू येणे किंवा देवदर्शन होणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे प्रवास निर्विघ्न होतो असे मानले जाते. प्रवासाच्या सुरुवातीला लहान मूल हसताना किंवा खेळताना दिसणे हे आनंद आणि शुभतेचे लक्षण मानले जाते. मुलांचे हास्य हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असल्याने प्रवास सुखकर होतो. तसेच, सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणे किंवा उजव्या बाजूने पक्षी उडताना दिसणे हे चांगले संकेत समजले जातात.
प्रवासाला निघताना पाण्याने भरलेले भांडे, नदी किंवा तलाव दिसणे हे समृद्धीचे आणि यशाचे चिन्ह मानले जाते. पाणी हे जीवन आणि प्रवाहाचे प्रतीक असल्याने प्रवासात अडचणी येत नाहीत, असे मानले जाते. याशिवाय, हत्तीचे दर्शन किंवा हत्तीचे चित्र दिसणे हे गणपतीच्या कृपेचे संकेत मानले जातात, ज्यामुळे संकटे दूर होतात.समोरून येणारी व्यक्ती पांढऱ्या, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घातलेली दिसली, तर तो देखील शुभ संकेत समजला जातो. तसेच, प्रवासाच्या वेळी फुलांचा किंवा अगरबत्तीचा सुगंध येणे हे सकारात्मकतेचे लक्षण मानले जाते.अर्थात, हे सर्व संकेत श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत. खरा शुभ प्रवास म्हणजे सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि योग्य तयारी. तरीसुद्धा, या शुभ संकेतांमुळे मनाला समाधान आणि धैर्य नक्कीच मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






