फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची सुरुवात 26 जूनपासून झालेली आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्री असे म्हटले जाते. यंदा 26 जूनपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. यावेळी नवरात्रीचा दुसरा दिवस शुक्रवार, 27 जून रोजी आहे. यावेळी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाणार आहे. देवीच्या या रुपांची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची कथा वाचणे शुभ मानले जाते. ब्रम्हचारिणीचा अर्थ ‘ब्रह्मा’ म्हणजे तपश्चर्या आणि ‘चारिणी’ म्हणजे तपश्चर्या करणारी. असा देखील होतो. यामुळे ब्रम्हचारिणी देवीला तपश्चर्या करणारी देवी असे म्हटले जाते. यावेळी देवीची उपासना केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात, अशी मान्यता आहे. तसेच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. जो व्यक्ती ब्रम्हचारिणी देवीची पूजा करतो त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश, आनंद आणि समृद्धी मिळते. या देवीला ज्ञान आणि तपस्याची देवी असे देखील म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिव पती म्हणून मिळावे, यासाठी देवी पार्वतीने तपस्या केली होती. ब्रम्हचारिणी देवीने पांढरी साडी परिधान केलेली आहे तसेच तिच्या उजव्या हातामध्ये माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे.
या दिवशी सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे आवरल्यानंतर गंगाजलाने देव्हारा स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर दिवा लावून देवीला आवाहन करा. नंतर तिच्या फोटो किंवा मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करुन घ्या. तसेच फुले, फळे, मिठाई आणि तांदूळ, सिंदूर देवीला अर्पण करा.
ब्रम्हचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. ‘या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्था । ‘नमस्तस्यै नमस्तेयै नमस्तेयै नमो नमः’ या मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर ठरु शकते. पूजा आणि मंत्रांचा जप करुन झाल्यावर देवीची आरती करावी. तसेच दुर्गा चालिसाचे पठण करावे. यामुळे व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)