फोटो सौजन्य- pinterest
आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर ठरते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावावा, जाणून घ्या
गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यास हे महाभारत ग्रंथाचे लेखक होते.
मान्यतेनुसार, पौर्णिमा तिथी ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी एक शुभ अशी तिथी मानली जाते. या तिथीच्या वेळी काही ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुमची पितृदोषापासून सुटका होते, असे मानले जाते. यंदा गुरुपौर्णिमा उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी आहे. या दिवशी पितरांसोबत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील ही तिथी शुभ मानली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही ठिकाणी दिवे लावल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या साधकाला धनप्राप्ती होते आणि अडीअडचणीपासून त्याची सुटका होते, असे म्हटले जाते.
पूर्वजांची दिशा ही दक्षिण मानली जाते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. यावेळी पूर्वजांच्या फोटोसमोर तिळाचा दिवा लावणे शुभ मानतात. असे केल्याने त्या व्यक्तीची पितृदोषापासून सुटका होते असे म्हटले जाते.
गुरुपौर्णिमेला नदीमध्ये दिवे सोडणे खूप शुभ मानले जाते. या उपायामुळे साधकाला पितृदोषापासून आराम मिळतो. तसेच पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे अशा लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप फायदेशीर ठरते. अशा व्यक्तींवर पूर्वजांचे विशेष आशीर्वाद राहतात.
पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. मात्र हा दिवा लावताना थेट जमिनीवर न ठेवता तो एका ताटामध्ये तांदूळ घेऊन त्यावर ठेवावा किंवा एखाद्या ताटामध्ये नुसता देखील ठेवू शकता. त्याचसोबत दिवा लावण्यावेळी पूर्वजांचे स्मरण करावे. तसेच जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने झालेल्या चुकांची माफी मागावी.
पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी जेवण करताना काही अन्न बाहेर काढून ठेवा आणि त्याचे तर्पण अर्पण करावे. त्याचबरोबर कावळ्यांना सुद्धा अन्न अर्पण करा. त्यासोबतच पितृस्तोत्र आणि पितृ कवच इत्यादींचे पठण करणे पितृदोषापासून सुटका मिळविण्यासाठी हे फायदेशीर आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)