भाईंदर/विजय काते : भाईंदर पश्चिमेतील जागृत देवस्थान म्हणून धारावी देवी मंदिराची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या श्रद्धेने, आणि भक्ती भावाने भाविक देवीच्या दर्शनाला येतात. आज सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असून मंदिर परिसर जय माता दीच्या गजराने भारावून गेला आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने घाटस्थापना करण्यात आली. त्यानंतर रोजच्या पूजा-अर्चा, कुमारी पूजन, होम-हवन, जागर व भजन-कीर्तन सुरू आहेत. देवीच्या गाभाऱ्याची विशेष फुलांनी सजावट करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी रंगीत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघतो.दररोज सकाळी व संध्याकाळी आरतीला मोठ्या संख्येने भक्त उपस्थित असतात.
रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, जागर गाणी आणि गरबा-दांडिया यामुळे वातावरण अधिक रंगतदार बनते.
धारावी देवी ही भाईंदर-पश्चिमची ग्रामदेवता मानली जाते. या मंदिराचा इतिहास थेट पेशवा काळाशी जोडला गेलेला आहे.
असे सांगितले जाते की, चिमाजी अप्पा यांच्या काळात गावकऱ्यांनी देवीचे हे स्थान उभारले.त्या काळापासून कोळी, आगरी, सोनार, लोहार, कुंभार या समाजांनी देवीची अखंड पूजा करत परंपरा जपली आहे.संकटाच्या काळात, रोगराई किंवा आपत्ती आल्यास गावकऱ्यांनी देवीला साकडे घातले आणि गाव वाचल्याच्या कथा पिढ्यांपिढ्या सांगितल्या जातात.
धारावी देवी ही जागृत देवता असल्याचा ठाम विश्वास आहे.भाविकांच्या मते देवीचे दर्शन घेतल्यावर मनोकामना पूर्ण होतात आणि आजार दूर होतात.दसऱ्याच्या दिवशी मंदिरात सुवर्णपुष्पांचा शिडकावा करून देवीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी हजारो भाविकांचा लोंढा मंदिरात येतो.देवीच्या चरणी डोकं टेकवल्यावर मानसिक शांती व आत्मविश्वास मिळतो, असा अनुभव भाविक कथन करतात.
मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक एकतेचे द्योतक आहे.मंदिर समितीकडून दररोज महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे.नवरात्रोत्सवात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, अन्नदान यांसारखे उपक्रम राबवले जातात.स्थानिक कलाकारांसाठी सांस्कृतिक मंच उपलब्ध करून दिला जातो.आज भाईंदर पश्चिमेतील धारावी देवी मंदिर हे श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे केंद्र बनले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येथे येणाऱ्या हजारो भक्तांमुळे मंदिर परिसरात एक वेगळेच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते.