Kokan Tourism- Chinchwadi Roha Raigad
वाली, ज्याला चिंचवाडी गाव असेही म्हटले जाते, हे निसर्गाच्या कुशीत व देवांच्या सानिध्यात वसलेले छोटेसे पण अतिशय सुंदर गाव आहे. प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असते आणि वाली गावही तसंच आपुलकीचं आहे. मुंबईपासून फारसे लांब नसलेले हे गाव अटल सेतू मार्गे अवघ्या २ ते २.३० तासांत गाठता येते.कोकणाची संस्कृती आजही कौलारू व मातीच्या घरांची संस्कृती जपणारे हे गाव रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वसलेले असून रोहापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. या गावाला धावीर महाराज मंदिराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिराला शासकीय सलामी दिली जाते, त्यामुळे रोहा तालुक्यासह वाली गावालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.वाली पंचक्रोशीतील सासाई देवी जिला रोहा-तळा तालुक्यात मानाचं स्थान आहे.तिची प्रचिती मंदिरात गेल्यावर नक्कीच जाणवते.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते.
कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थांनी वाढवा जेवणाची चव! जगभरात आवडीने खाल्लेले जातात ‘हे’ पदार्थ
वाली गावाची आणखी एक ओळख म्हणजे येथे असलेला स्वयंभू गणपती. या गणपतीची सोंड डाव्या बाजूला असून तो सर्वांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. हा गणपती सर्वांचा आहे, येथे भक्तांमध्ये कोणताही भेदभाव नाही. सर्वजण समान भावनेने भक्तिभावाने त्याची पूजा करतात. या गावातील लोक साधे, भोळे आणि कष्टाळू आहेत. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून गाईच्या दुधावरही अनेक कुटुंबांचे घर चालते. नाती जपणारी, एकमेकांना सांभाळणारी माणसं हे या गावाचं खरं वैभव आहे.
वाली गावात गणेश उत्सव आणि माघी गणेश जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. माघी गणपती साजरी करण्याचे हे ६७ वे वर्ष आहे.सन १९६० पासून गावाला उत्सवाची भली मोठी परंपरा आहे.त्या दिवशी गणपतीची भव्य सजावट केली जाते, पूजा-अर्चा करून नैवेद्य अर्पण केला जातो आणि भक्तांना तसेच ग्रामस्थांना प्रसाद वाटला जातो. दुपारी व रात्री जेवणाची व्यवस्था असते, तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच वृक्षारोपण शालेय वस्तू वाटप आणि वैद्यकीय शिबीर भरवून सामाजिक बांधिलकी जपली जाते.अशा सुंदर आणि सुसंस्कृत पद्धतीने माघी गणपती उत्सव साजरा होतो. Kokan Tourism पर्यटनाच्या दृष्टीनेही वाली गाव समृद्ध आहे. नद्या, डोंगर आणि हिरव्या गालीच्यासारखी शेती यामुळे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. काही किलोमीटर अंतरावर तळा बस डेपो असून आरोग्याच्या दृष्टीनेही
हे गाव महत्त्वाचे आहे. जवळच बौद्ध लेणी आहेत, तसेच पुढे गेल्यावर मुरुड-जंजिरा किल्ला पाहता येतो. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी काढून या परिसरातील अनेक पर्यटनस्थळे पाहता येतात.
भूत, प्रेत, पिशाच्च ‘या’ देवाला घाबरतात, कोकणातील एक रहस्यमय देऊळ
तळा परिसरात शिवाजी महाराजांचा तळगड, सुंदर ऐतिहासिक मंदिरे तसेच विविध सांस्कृतिक ठेवे पाहायला मिळतात. या सर्व कारणांमुळे चिंचवाडी (वाली) गाव एक महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण गाव मानले जाते. जुनी परंपरा जपत, आधुनिकतेची नाळ जोडून हे गाव आजही सर्वांना आपुलकीने जोडून ठेवते.






