शारदीय नवरात्रीतला यंदाचा तिसरा रंग म्हणजे रंग निळा. खरंतर गडद निळा रंग हा महत्वकांक्षा आणि साहस याचं प्रतीक आहे. हिंदू धर्मात निळा रंग (Blue Color) हा अनेक देव-देवतांशी संबंधित आहे, परंतु तो मुख्यतः शक्ती, शांती, अमरत्व, अनंतता आणि आकाश-समुद्राच्या गूढ शक्तीचे प्रतीक मानला जातो. देवींच्या संदर्भात निळ्या रंगाचं विशेष महत्व असं आहे. हिंदू धर्मातील देव जसं की, कृष्ण, महादेव आणि शनीदेव यांना निळ्या वर्णात दाखवलं गेलं आहे. अशीच एक देवता म्हणजे देवी काळरात्री. या देवीला काळ्या वर्णात दााखवलं गेलं असलं तरी गडद निळा या रंग तिला अत्यंत प्रिय आहे.
काळरात्री देवी नवरात्रातील सातव्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. नवदुर्गांपैकी सर्वात गूढ आणि प्रभावी स्वरूप असलेली ही देवी. तिच्या नावाचा अर्थच तिचं वैशिष्ट्य सांगतो. काळी रात्र, म्हणजेच अज्ञान, भीती आणि नकारात्मकतेचा पूर्ण अंत. काळरात्रीचं महात्म्य हे केवळ साहस आणि संरक्षणापुरतं मर्यादित नसून आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षदायी शक्तीचं प्रतीक आहे.
प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या दोन असुरांनी त्रैलोक्य जिंकून देवकुळाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचा सेनापती रक्तबीज याला एक विशेष वरदान प्राप्त होतं. त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडला तरी त्यातून आणखी असंख्य रक्तबीज जन्माला येत.देवी दुर्गेने जेव्हा रक्तबीजाशी युद्ध केलं तेव्हा त्याच्या रक्तामुळे हजारो असुर निर्माण होऊ लागले.या संकटाचा अंत करण्यासाठी देवीने आपलं भयंकर रूप धारण केलं. त्या रूपाला काळरात्री असं नाव पडलं.तिने रक्तबीजाचा वध करताना त्याचं रक्त जमिनीवर पडू नये म्हणून आपल्या जिभेने सर्व रक्त पिऊन टाकलं आणि असुरांचा संहार केला.काळरात्री ही दुष्ट शक्तींचा अधर्माचा संंपूर्ण नाश करून धर्माचं रक्षण करणारी शक्ती आहे.
काळरात्रीचं काळसर-निळं रूप म्हणजे सृष्टीपूर्व अंधार, अनंत काळ आणि महाशक्तीचं प्रतीक आहे.अज्ञान आणि भीती हा केवळ एक तात्पुरता अंधार आहे.या अंधाराचा नाश करूनच ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो.देवी काळरात्रीची आख्यायिका हे शिकवते की भयावह अंधारातूनच नवीन उषःकालाची निर्मिती होते. तिच्या भयंकर रूपातही भक्तांसाठी अभय, रक्षण आणि मोक्षाचा मार्ग सामावलेला आहे.
देवीचं काळसर-निळं शरीर म्हणजे महा-शून्य, काळ आणि अज्ञानाचा नाश आहे अशी धारणा आहे. तिचा कांतीचा निळा रंगाचा अर्थ असा की, अंधारातूनच प्रकाशाची निर्मिती होते.काळरात्री आणि निळा रंग भक्ताला सांगतात की, जीवनातील अंधार, भीती आणि नकारात्मकता ही नष्ट करण्यासारखी तात्पुरती गोष्ट आहे.ध्यान, साधना आणि देवीची उपासना केल्याने आपण आतल्या निळ्या आकाशासारख्या शांततेकडे जाऊ शकतो. ॐ देवी कालरात्र्यै नमः”हा मंत्र जपतांना निळ्या रंगाची कल्पना केल्यास मनातील भय नाहीसं होऊन आध्यात्मिक उर्जा वाढते. असं पुराणात सांगितलेलं आहे.