भाजपाची मुस्लिमांसाठी विशेष भेट, ‘सौगात-ए-मोदी’चा अनोखा राजकीय अर्थ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
तानाजी म्हणाला, नेताजी, उर्दू भाषेत एक नजाकत आहे, त्याला एक लहेजा आहे, गोष्ट सांगायची एक खास पद्धती आहे. त्यावर नेताजी म्हणाले, तानाजी उर्दूबाबत सांगायचे झाले तर भाषेला एक गोडवा आहे, भाषा सौष्ठव आहे आणि उत्कटता आहे. तिची वर्णनशैलीसुद्धा सुंदर आहे. भाषणात किंवा संभाषणात बोलताना उर्दू भाषेतील भारदस्त शब्दांचा वापर आपसूक होतो अन् प्रभाव पाडून जातो. तानाजी म्हणाला, नेताजी उर्दूचा वापर आपण करीत नाही, तर खुद्द भाजपाने केला आहे. बिहारातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना खूश करण्यासाठी त्यांना सौगात-ए-मोदी नावाने भेट दिली आहे. या भेटीत खाण्यापिण्याच्या काही आवश्यक वस्तूंसोबतच मुस्लिम महिलांसाठी खास सलवार सूटचे कापड दिले आहे आणि तेसुद्धा या देशाच्या वजीर-ए-आजम अर्थात पंतप्रधानांमार्फत ही खास भेट दिली जाणार आहे. आपणास तर सौगात-ए-मोदीवरून मुगले आझमची आठवण आली असेल.
हे देखील वाचा : अमेरिकेचे शेती अनुदान आणि भारताची टैरिफ धोरणे यामागचं नेमकं वास्तव काय?
आपणसुद्धा उर्दूची शायरी ऐका. साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या सुमधुर गीतांचा आनंद घ्या. दीवन-ए-गालिब वाचा. त्यावर नेताजी म्हणाले, तानाजी भाषावादाला उगाच वाढवू नकोस. सौगात-ए-मोदी म्हणजेच मोदींकडून सप्रेम भेट ! उगाच वाद वाढविण्याऐवजी मराठीतही बोलत चला… पानी याला जल किंवा पाणी, दलील याला तर्क, मश्वराला सल्ला घेणे, अश्क याला अश्रू, रहमला दया, जुल्म याला अत्याचार, जुल्फें याला केसांची लट किंवा बट, दास्तान याला गोष्ट किंवा कथा, सलीका याला शिष्टाचार, गुनाह याला गुन्हा, वतन याला देश, सुबे याला प्रांत किंवा प्रदेश, सुबह याला सकाळ, शाम याला संध्याकाळ, उजाला याला प्रकाश, दौलत याला संपत्ती, दिल याला मन किंवा हृदय, दिमाग याला डोके किंवा मेंदू, जिगर याला यकृत, बेखौफ याला नीडर, जायकेदार खाना याला स्वादिष्ट भोजन, निवाला याला घास रास्ते याला मार्ग.
हे देखील वाचा : Supreme Court : महिलांप्रति भेदभाव कधी संपणार? न्यायसंस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
खून याला रक्त, दवाई याला औषधी, कातिल याला खुनी किंवा हत्यारा, मरहूम याला स्वर्गीय, खोजबीन याला शोध किंवा अन्वेषण म्हणत चला. त्यावर तानाजी म्हणाला, नेताजी आपल्याला आता जरुरत याला गरज, तकलीफ याला कष्ट, हमदर्दी जताने याला सांत्वना देना म्हणावे लागेल. उर्दूतील शुक्रियाऐवजी आपण धन्यवादच म्हणू. आपण उर्दूचा वापर करण्याऐवजी मराठीचाच वापर करू. शेवटी आपली मराठी काही कमी नाही, तर माझी मराठी बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके अर्थात मराठी ही अमृतासोबतसुद्धा शर्यत, पैज जिंकू शकणारी भाषा आहे