फोटो सौजन्य: गुगल
“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि या देशाचे आपण देणं लागतो”, हे वाक्य ऐकलं किंवा वाचलं की एक नाव आपसूकचं आठवतं, ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची आज 141वी जयंती. ब्रिटीशांचा जुलुम आणि गुलामी दिडशे वर्ष देशाने झेलला होता. या ब्रिटीशांच्या जाचाविरुद्ध अनेक क्रांतिकारकांनी बंड पुकारलं. केवळ बंड पुकारलंच नाही तर साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा अवलंब करत मातृभूमीचा उद्धार करण्यासाठी प्राणांची बाजी या क्रातिकारकांनी लावली आणि त्यातले एक नाव म्हणजे स्वातंत्र्यावीर सावरकर. मातृभूमीवरील अपार प्रेम आणि ब्रिटीशांंच्या अनैतिकतेला पुरुन उरणारं नाव म्हणजे सावरकर.
अंंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा किंवा जन्मठेप सावकरांचं धाडस, प्राण हातावर घेऊन निडर लढण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर शस्त्रानिशी लढले खरे पण हे शस्त्र फक्त ब्रिटीशांना किंवा देशद्रोहींना रक्तबंबाळ करणारंच नव्हे, तर देशवासियांना आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या मातृभूमी वरील प्रेम जागृत करणारं देखील शस्त्र होतं आणि ते शस्त्र म्हणजे सावरकरांची लेखणी. सावरकरांचं देशाप्रति किती प्रेम होतं याची साक्ष सावरकरांचं वाड्मय देतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त क्रांतिकारकच नव्हते, तर ते वीरकवी देखील होते.
शब्दसंपदा, साहित्य यावर असलेलं सावरकरांचं प्रभुत्व, त्यांची देशाप्रतिची तळमळ, अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या लेखांमधून आजही वाचकांना भारावून टाकते. असं म्हटलं जातं कवी हा संवेदनशील असतो. या महाराष्ट्राला थोर पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे, तसाच साहित्याचा देखील वारसा लाभलेला आहे. जेव्हा अन्याय-अत्याचार होतात तेव्हा शब्द पेटून उठतात. संत तुकोबा असो किंवा ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांनीच आपल्या संतवाणीतून समाजातील अन्याय अत्याचाराविरोधातील चीड व्यक्त केली आहे. हीच वेदना हाच त्रागा सावरकरांच्या प्रत्येक कवितेतून अंगावर शहारे आणतात. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी या गुलामगिरीविरोधात सावरकरांनी ‘फटका’ हा काव्यप्रकार लिहिला. स्वत:चं अस्तित्व टिकवायचं असेल तर’ स्वदेशी’ वस्तू वापरायला पाहिजेत. हाच हेतू भारतीयांच्या मनात रुजवण्यासाठी सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली आणि स्वदेशी वस्तूंबाबत प्रत्येकाच्या मनात विचार पेरले. फटका या काव्यप्रकारात सावरकर म्हणाले की,
आर्यबंधु हो उठा उठा कां मठासारखे नटा सदा
हटा सोडूनी कटा करूं या म्लेंछपटां ना धरूं कदा
काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां
मलमल त्यजुनी वलवल चित्तीं हलहलके पट कां वरितां ?
राजमहेंद्री चीट त्यजोनी विटकें चिट तें का घेतां
दैवें मिळतां वाटि इच्छितां नरोटी नाहीं का आतां ?
नागपुरचें रेशिम भासे तागपटासें परि परक्या
रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागती तुम्हां कश्या ?
येवलि सोडून पितांबरांना विजार करण्या सटिन पहा
या फटक्यात सावरकर म्हणतात, स्वत:जवळ असलेल्या नैसर्गिक साधनांचा वापर आणि कलेचा वापर न करता का विदेशीचंं कोडकौतुक करता ? काश्मीरच्या मखमलीसारखं कापड आपल्याकडेे असताना आपण का म्हणून पाश्चिमात्य कापड्याला महत्त्व देता. मुर्ख माणसांनो, स्वदेशीच्या वस्तूंना तुम्हीच नाकारले तर गुलामगिरी तुम्हालाच गिळेल हे कसं तुम्हाला कळू नये, अशा पडखर शब्दात सावरकरांनी स्वदेशीचं महत्त्व वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सांगितलं होतं. ज्या कोवळ्या वयात विद्यार्थी शिक्षणाचा आधार घेत भविष्य गिरवत असतात त्याच वयात सावरकरांच्या मनात स्वातंत्र्याची बीजं रुजली होती. सावरकरांनी अनेक काव्य रचली त्या प्रत्येक काव्यात मातृभूमीचा उद्धार व्हावा हीच तळमळ व्यक्त होते.
इंग्रजांनी जेव्हा सावरकरांना अटक केली, तेव्हा आता आपण पुन्हा आपल्या मायदेशी जाऊ की नाही,हा प्रश्न सावरकरांपुढे उभा राहिला आणि त्या वेदनेतून जन्मलेले शब्द होते,
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं। सृष्टिची विविधता पाहूं मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन
तई जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
विश्वसलों या तव वचनीं। मी
जगदनुभव-योगे बनुनी। मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला। सागरा, प्राण तळमळला
देशप्रेमाने आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या या स्वातंंत्र्यावीराला नवराष्ट्रचा मानाचा सलाम!
(संदर्भ: सावरकरांची कविता या ऑनलाईन पुस्तकावर आधारित हा लेख लिहिण्यात आला आहे. )