भारतात सर्वत्र साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. देशभरात विविध राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. अशीच एक दिवाळीबाबतची परंपरा आगळी वेगळी परंपरा पाहायाला मिळते ते म्हणजे गुजरातमध्ये. गुजरातमधील दिवाळी साजरी करण्याची पद्धत महाराष्ट्रापेक्षा थोडी वेगळी आणि खास आहे.
पपंररा आणि प्रथेत थोडाफार फरक असला तरी दिवाळी साजरा करण्याचा अर्थ एकच तो म्हणजे अंध:कारावर प्रकाशाचा होणारा विजय. मात्र गुजरातमध्ये दिवाळी सणाची परंपरा काहीशी वेगळी आहे. गुजरातमध्ये दिवाळी सणाला व्यापारी, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व अंगांनी मोठं महत्व आहे.गुजरातमध्ये दिवाळीला “नववर्ष” म्हणूनही साजरं केलं जातं. महाराष्ट्रात जिथं पाडवा दिवाळीनंतरचा दुसरा दिवस असतो, तिथं गुजरातमध्ये तो दिवस “बेस्टु वारस ” म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी व्यापारी वर्ग आपली नवीन हिशोबाच्या वह्या उघडतात. या प्रथेला गुजरातमध्ये “चोपडा पूजन” असं म्हणतात. हे पूजा विधी धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन आर्थिक वर्ष शुभ होण्यासाठी केले जातात.
दिवाळीच्या आधी धनोत्रयदशी आणि काळी चौदस हे सण गुजराती भाषिक मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. धनोत्रयदशीला लोक सोनं-चांदी, भांडी किंवा नवी वस्तू विकत घेतात.गुजरातमधील आणखी एक प्रथा खुपच रंजक आहे. ती म्हणजे ‘काळी चौदस’ म्हणजे यमराजाचं पूजन करून वाईट शक्तींपासून संरक्षण मागितलं जातं, अशी या धारणा आहे.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरोघरी सुंदर रंगोळ्या, तेलाचे दिवे आणि सुगंधी अगरबत्त्यांनी वातावरण भारलेलं असतं. व्यापारी दुकाने, कार्यालयं आणि घरं चमचमत्या सजावटीने उजळलेली दिसतात. स्त्रिया पारंपरिक गुजराती पोशाखात सजतात आणि “गर्वा”, “डांडिया” सारखे नृत्य कार्यक्रमही आयोजित केले जातात.
दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बेस्टु वारस दिवशी लोक एकमेकांना “साल मुबारक” किंवा “नव वर्षाभिनंदन” म्हणत शुभेच्छा देतात. या काळात मिठाई, फटाके आणि स्नेहभोजनांची रेलचेल असते.अशा रीतीने, गुजराती दिवाळी ही फक्त आनंदाचा नाही तर नवीन सुरुवातीचा आणि समृद्धीचा सण मानली जाते.
गुजराती दिवाळीत खाल्या जाणाऱ्या पारंपरिक मिठाई आणि पदार्थ
गुजराती दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि रंगोळ्यांचा सण नव्हे, तर स्वादिष्ट मिठाईची चव चाखायला मिळते. या काळात प्रत्येक घरात पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. गोड, तिखट, खमंग आणि सुगंधी पदार्थ दिवाळीच्या आनंदाला आणखी खास बनवतात.
१. मोहनथाळ :
हे श्रीकृष्णाला प्रिय असलेलं गोड पक्वान्न आहे. बेसन, साखर, तूप आणि वेलची यांच्या मिश्रणातून तयार होणारं मोहनथाळ गुजरातच्या प्रत्येक घरात दिवाळीत बनवलं जातं. त्याचा सुगंध आणि मऊसर पोत अगदी खास असतो.
२. घुघरा (गुजिया):
हे तुपात तळलेले गोड कडबोळीसारखे पदार्थ असतात. आतमध्ये सुका मेवा, खोबरे, साखर आणि वेलची यांचं सारण भरलेलं असतं. दिवाळीच्या फराळात हा पदार्थ अपरिहार्य मानला जातो.
३. चिक्की आणि शिंग लाडू :
गुजरातमध्ये शेंगदाणे, तीळ, गूळ यांच्या विविध प्रकारच्या चिकक्या आणि लाडवांचा खास प्रसार आहे. हे शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीच्या दिवसात आरोग्यासाठीही उत्तम असतात.
४. फाफडा-जलेबी :
दिवाळीच्या सकाळी फाफडा-जलेबी हा लोकप्रिय नाश्ता असतो. तिखट कुरकुरीत फाफड्याबरोबर गरमागरम जलेबी खाण्याची परंपरा दिवाळीला खास चव देते.
५. सेव, गाठीया, मठिया :
हे खमंग आणि कुरकुरीत स्नॅक्स दिवाळीच्या दिवसांत सतत पाहुण्यांना दिले जातात. हे पदार्थ चहाबरोबर अत्यंत चविष्ट लागतात.
६. खीर आणि श्रीखंड :
दिवाळीच्या मुख्य जेवणात दूध, साखर, ड्रायफ्रूट्स यांची खीर आणि आंब्याचं किंवा साधं श्रीखंड हा गोड शेवट असतो.
हे पदार्थ केवळ चवीसाठी नव्हे तर स्नेह, एकोप्याचा आणि समृद्धीचा प्रतीक म्हणूनही पाहिले जातात.
गुजराती दिवाळी हा केवळ आनंद, सजावटीचा सण नसून आध्यात्मिक आणि पारंपरिक श्रद्धेचं प्रतीक आहे. गुजरातमध्ये दिवाळीचे चार दिवस अत्यंत धार्मिक विधी आणि भक्तिभावाने साजरे केले जातात.
१. धनतेरस :
दिवाळीचा प्रारंभ धनतेरसपासून होतो. या दिवशी लोक नवीन भांडी, सोनं-चांदी किंवा मौल्यवान वस्तू विकत घेतात. कारण असं मानलं जातं की, या दिवशी खरेदी केल्याने घरात धन-समृद्धी टिकते. अनेक कुटुंबं या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन करतात, ज्यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभतं.
२. काळी चौदस (नरक चतुर्दशी):
या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला अशी कथा आहे. म्हणून या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून शरीरावर उटणं लावतात. घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावं म्हणून यमराजाचं पूजन केलं जातं.
३. लक्ष्मी पूजन :
गुजरातमध्ये हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. व्यापारी वर्ग आपली नवीन “चोपडा” (हिशोबाची वह्या) उघडतो आणि लक्ष्मीदेवीचं पूजन करतो. या पूजनाला “चोपडा पूजन” म्हणतात. लोक दिवे लावून संध्याकाळी देवीचं आवाहन करतात आणि म्हणतात — “लक्ष्मी माता, आवो ने, अमारो व्यापार चालतो रहो.”
४. बेस्टु वारस (नववर्षाचा पहिला दिवस):
लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी गुजराती लोकांचं नववर्ष सुरू होतं. या दिवशी लोक एकमेकांना “साल मुबारक” म्हणत शुभेच्छा देतात. घरोघरी मिठाई वाटली जाते आणि लोक नवे कपडे परिधान करतात.
५. भाईबीज :
या दिवशी बहिणी आपल्या भावाचं पूजन करून त्याच्या आयुष्याची प्रार्थना करतात. हा दिवस भावंडांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.
गुजरातमधील दिवाळीची खासियत म्हणजे तिचं आध्यात्मिक आणि आर्थिक संतुलन — भक्ती, परंपरा आणि समृद्धी यांचं सुंदर मिश्रण, अशी ही गुजराती दिवाळीची परंपरा इतर राज्यातील परंपरेपेक्षा वेगळी ठरते.