भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 चा विजयस्तंभ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एकीककडे नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. लोक नवीन संकल्प करत आहेत. अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शानाने करत आहेत. तर दुसरीकडे कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांना सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. आज या लढाईला 207 दिवस पूर्ण होतील. पण तुम्हाला हा दिन साजरा का केला जातो. या दिनाचा इतिहास काय आहे हे माहित आहे का? तर आज या दिनाचा नेमका इतिहास काय आहे? काय झाले होते त्या दिवशी? हे आपण जाणून घेऊयात.
भीमा-कोरेगावची लढाई
तर, कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. त्यावेळी पुण्यावर ब्रिटीशांचे राज्य होते. पुण्यातील पेशव्यांचा बालेकिल्ला इंग्रजांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी ही लढाई ब्रिटीश आणि दुसरे बाजीराव पेशव्यांमध्ये झाली होती. पेशव्यांकडे तब्बल 28,000 सैनिकांची बलाढ्य फौज होती, तर ब्रिटीशांकडे फक्त 800 सैनिक होते. यामध्ये ब्रिटीशांच्या “बॉम्बे नेडिव्ह इन्फ्रंट्री” या तुकडीत विविध जाती-धर्मांचे 500 सैनिक होते.
इंग्रज सैन्याचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉन्टन यांनी केले. या युद्धात इंग्रजांच्या सैनिकांनी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले व पेशव्यांच्या सैन्याला तब्बल 12 तास रोखून धरले. ब्रिटीशांची मोठी तुकडी येत असल्याची माहिती मिळाल्यावर पेशव्यांनी माघार घेतली, आणि ब्रिटीशांना विजय मिळाला.
विजयस्तंभाजी उभारणी
या युद्धात विजय मिळाल्यानंतर ब्रिटीशांनी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. हा विजयस्तंभ ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक बनला. दरवर्षी 1 जानेवारीला या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो. पेशव्यांच्या राजवटीत दलित समाजाला प्रचंड छळ, अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे. त्यांच्या मुलभूत अधिकारांवरही गदा आणली जात होती. मात्र या विजयाकडे पाहण्याचा भारताचा वेगळा दृष्टीकोन असून यामध्ये धारातिर्थ पडलेल्या सैनिकांचा सन्मानाला सलाम म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
कोरेगाव भीमा येथील लढाई दलित समाजासाठी केवळ एक विजय नसून, अन्यायाविरोधातील लढ्याचे प्रतीक आहे. या लढाईत दलित सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला पराभूत करून आपले शौर्य दाखवले. त्यामुळे कोरेगाव भीमाच्या लढाईला दलित समाज विशेष महत्त्व देतो. कोरेगाव भीमा येथील लढाई ही फक्त इंग्रज आणि पेशव्यांमधील युद्ध नव्हती, तर ती एका समाजाच्या अन्यायाविरुद्ध उभारलेल्या लढ्याची कहाणी आहे. विजयस्तंभ हा त्या शौर्याचा आणि धैर्याचा साक्षीदार आहे. शौर्य दिवस हा दलित समाजाला प्रेरणा देणारा दिवस असून, त्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो.