National Science Day 2025 : नागरिकांमध्ये वैज्ञानिक विचार आणि मानसिकता वाढवणे ही काळाची गरज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ समर्पित करण्यात आला आहे. १९२८ मध्ये त्यांनी कोलकाता येथे रामन इफेक्ट चा शोध लावला, जो प्रकाशाच्या तरंगलांबीतील बदलासंदर्भात होता. या शोधामुळे त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा होता की, १९८६ पासून राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढती गरज
विज्ञान आणि संशोधन हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. विज्ञान दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करणे आणि नवकल्पनांना चालना देणे. भारतीय संविधानाच्या कलम ५१(A) नुसार, प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असा संदेश या निमित्ताने दिला जातो. विज्ञान दिनाच्या निमित्ताने विविध शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये परिसंवाद, प्रदर्शन आणि वैज्ञानिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : परदेशी शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळणे होणार सोपे
विविध वर्षांतील विज्ञान दिनाच्या विशेष थीम्स
दरवर्षी विज्ञान दिनासाठी वेगवेगळ्या वैज्ञानिक थीम ठरवल्या जातात, ज्या समाजाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहाशी जोडण्याचे काम करतात. २०२४ मध्ये “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” ही थीम होती. या आधीच्या काही उल्लेखनीय थीम्स अशा होत्या:
२०२१ – शिक्षण, कौशल्य आणि भविष्यावर विज्ञानाचा प्रभाव.
२०२० – महिला आणि विज्ञान.
२०१९ – लोकांसाठी विज्ञान आणि विज्ञानाशी लोकांचा संबंध.
सी. व्ही. रमण यांचा वैज्ञानिक वारसा
सर सी. व्ही. रमण यांनी १९०६ मध्ये प्रकाश विवर्तनावर पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. १९२१ मध्ये ब्रिटनच्या प्रवासादरम्यान त्यांना समुद्राचा निळा रंग पाहून वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण झाली. याच संशोधनातून पुढे रामन इफेक्ट चा शोध लागला. हा शोध आजही स्पेक्ट्रोस्कोपीच्या संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांत रामन इफेक्टचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
भारतीय विज्ञान आणि संशोधनातील प्रगती
गेल्या दहा वर्षांत भारताने विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. चंद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. भारत आता उपग्रह प्रक्षेपणात जागतिक पुढारी बनत आहे. देशांतर्गत संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात स्वदेशी लस निर्मिती यशस्वी ठरली. भारत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये ४० व्या स्थानावर आहे, जे संशोधन आणि विकासात झालेल्या मोठ्या प्रगतीचे द्योतक आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व
या दिवसाचे उद्दिष्ट युवकांना विज्ञानाची गोडी लावणे, वैज्ञानिक प्रयोगांबद्दल माहिती देणे आणि संशोधनासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. सरकार आणि वैज्ञानिक संस्था एकत्र येऊन नवनवीन शोध आणि वैज्ञानिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. भारताने “विकसित भारत २०४७” हे उद्दिष्ट ठरवले आहे, ज्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासाला मोठे महत्त्व देण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीवरचा अनमोल दुर्मिळ खजिना जगात कुठे दडला आहे? 10 मोठ्या देशांची यादी आली समोर, ट्रम्पचा त्यावरही डोळा
भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने एक पाऊल
राष्ट्रीय विज्ञान दिन हा केवळ विज्ञानाच्या सन्मानासाठी नसून, भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आहे. भारतीय विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या दिवसाचा उपयोग होतो. युवकांनी विज्ञान आणि संशोधनात अधिक लक्ष घालावे आणि भारताच्या वैज्ञानिक वारशाला पुढे न्यावे, हीच या दिवसाच्या निमित्ताने अभिलाषा व्यक्त करावी लागेल. जय भारत, जय विज्ञान, जय संशोधन!






