अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर (फोटो- istockphoto)
पुण्यात १.०९ लाख विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
३ जूनपर्यंत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक
सोनाजी गाढवे / पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी दिं. २९ जाहीर करण्यात आली. पुणे विभागातील १ लाख ९ हजार ६२३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कनिष्ठ (Career) महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
राज्यात शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे विभागात अकरावीसाठी एकूण ३ लाख ९६ हजार २६६ प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. पहिल्या नियमित फेरीत विभागातील १ लाख ७२ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी ‘कॅप लॉक’ प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या पसंतीक्रमानुसार १ लाख ९ हजार ६२३ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे.
पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून विहित शुल्क भरावे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रवेशाची पुष्टी केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशाचा ‘श्रीगणेशा’! पहिली गुणवत्ता यादी जाहीर; तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना…
पुणे विभाग आकडेवारी
विभाग – प्रवेश क्षमता – कॅप लॉक – महाविद्यालय वाटप
पुणे – ३९६२६६ – १७२७९१ – १०९६२३
पहिल्याच दिवशी झालेले प्रवेश
विभाग – कॅप – इन हाऊस – अल्पसंख्याक – व्यवस्थापन
पुणे – ५५९ – ३९ – ३३ – २५
अकरावी प्रवेशाचा ‘श्रीगणेशा’! पहिली गुणवत्ता यादी जाहीर
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी दिंनाक २९ सकाळी जाहीर करण्यात आली असून, राज्यातील ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.






