फोटो - सोशल मीडिया
पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये नानाविध नावांची आणि आडनावांची मंदिरं आहे. काही खाजगी आहे त्यामुळे वंशपंरपरेनुसार या मंदिरांना त्या कुटुंबाच्या नावानेच ओळखले जाऊ लागले. असेच एक शहरातील नारायण पेठेमध्ये वसलेले मोदी गणपती मंदिर. गणपतीचे नाव ‘मोदी’ ऐकून अनेकांना सुखद धक्का बसतो. मोदी गणपतीच्या नावाप्रमाणे त्याचे मंदिर देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. रत्नागिरीमधील भट कुटुंबाचे पुण्यातील हे खाजगी मंदिर असलेलं मोदी गणपती आपली ओळख आजही जपून आहे.
मोदी गणपती मंदिर साधारणतः 200 वर्षापूर्वी बांधण्यात आले. 19 व्या शतकामध्ये मोदी गणपतीचे दोन मजली मंदिर बांधण्यात आलं होतं. चौकाच्या मधोमध असलेलं हे मंदिर कौलारू आहे. मंदिराचा शांततामय परिसर आणि जुन्या आठवणीं जपणारा मंदिराचा सभागृह आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच एका बाजूला मारूतीचे मंदिर आहे. छोटेखानी या मंदिरानंतर गणपतीचे मुख्य मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम लाकडी असून वाडासदृश्य हे मंदिर आहे. लाकडी कमानी मंदिराच्या सभागृहाचे सौंदर्य वाढवत आहेत. या महिरमी कमानी असून त्यावर सुबक असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. भाविकांना बसण्यासाठी सभागृहामध्ये मोठी जागा असून अष्टविनायकांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर गणेशाची विविध अवतार आणि श्लोक कोरण्यात आले आहेत. या रंगीत चित्रांमध्ये गणेशाची अनेक रुप आहेत.
मंदिरांच्या सभागृहामध्ये एक आडवा मंडप आहे. यामध्ये गणरायाचे वाहन असलेला मुषकराज आहे. लाडू खात असलेला शेंदूरी मुषक लक्षवेधी आहे. त्याचबरोबर गर्भगृहामध्ये पितळी मखरामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान आहे. ही एक मीटर उंचीची, चतुर्भुज आणि उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. ही शेंदूरी गणरायाची मूर्ती असून तिचे डोळे लक्ष वेधून घेतात. मोदी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून विख्यात आहे.
मोदी गणपती मंदिर पुण्यामध्ये असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते. या गणपतीला ‘मोदी’ नाव पडण्यामागे देखील एक गोष्ट आहे. गणपती बाप्पाची सुंदर आणि स्वयंभू अशी मूर्ती पारशी गृहस्थ शेठजी मोदी यांच्याकडे सापडली. आत्ता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्याठिकाणी शेठजी मोदी यांची वैयक्तिक मोठी बाग होती. या बागेमध्ये गणरायाची मूर्ती सापडली. त्यामुळे या गणरायाला मोदी गणपती असेच नाव पडले. शेठजी मोदी हे पेशव्यांच्या दफ्तरी मोठे नाव होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान असल्यामुळे शेठजी मोदी हे पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये अनुवादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बागेमध्येच ही मूर्ती सापडल्यानेच ‘मोदी गणपती’ नावाने ती प्रचलित झाली.
मोदींच्या बागेमध्ये गणरायाची मूर्ती सापडली असली तरी तिची प्राणप्रतिष्ठा भट कुटुंबाने केली. पितळी देवघरामध्ये त्यांनी गणरायाची मूर्ती स्थापित केली. त्यामुळे मोदी गणपतीची मालकी आजही ही रत्नागिरीमधील भट कुटुंबाकडे आहे. भट कुटुंबाचे हे खाजगी मंदिर आहे. वाढत्या रहदारीमुळे मंदिराचे मुख्य द्वार लवकर लक्षात येत नाही. मात्र मोदी गणपती जुन्या मंदिरांचा वारसा जपत आजही उभे आहे.






