फोटो सौजन्य - सोशल मीडिया
डेहराडून : सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण ५ पदकांची लयलूट करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इंडीयन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. त्यानंतर गौरव चांदणे आणि भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडीयन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केला.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. गौरव चांदणे (अमरावती) आणि भावना सत्यगिरी (पुणे) या जोडीने झारखंडच्या जोडीचा ६-२ (३६-३४, ३७-३४, ३३-३५, ३४-३३) असा पराभव करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राने हे सोनेरी यश संपादन केले. १६ वर्षीय भावना सत्याजित ही रणजित चामले यांची शिष्या असून, ती आर्चर्स अकॅडमी, पुणे येथे सराव करते. अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे व प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने हे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले.पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख स्मिता शिरोळे, सुनील पूर्णपात्रे यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे आणि पवन जाधव या संघाने तिरंदाजीच्या इंडीयन राऊंड प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या पदकसंख्येत भर घातली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्यपदकाच्या लढतीत ओडिशा संघाचा ६-० (४८-४५, ५७-४७, ५५-५१) असा धुव्वा उडविला.
आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळे, किमया कार्ले यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक संघासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून पदकांचा खजिना उघडणारा असून, नेहमीप्रमाणेच यंदाही भरघोस पदके जिंकण्याची संधी आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या भागीरथी संकुलात जिम्नॅस्टिक्सच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये शनिवारी प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे. त्यामध्ये रिदमिक, ट्रॅम्पोलिन, एरोबिक्स, आर्टिस्टिक या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
कराचीच्या नॅशनल स्टेडियममधील या चुकांमुळे ICC नाराज, PCB ला सांगितले चाहत्यांचे पैसे परत करण्यास!
रिदमिक या क्रीडा प्रकारात संयुक्त आणि किमया या अनुभवी खेळाडूंबरोबरच परिणा मदनपोत्रा आणि शुभश्री मोरे या नवोदित खेळाडूंकडूनही महाराष्ट्राला पदकाच्या आशा आहेत. ट्रॅम्पोलिन या क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू राही पाखळे हिच्याकडून वैयक्तिक विभागात पदकाची आशा असून, सांघिक विभागातही महाराष्ट्राला पदक मिळेल असा अंदाज आहे. एरोबिक्समध्ये आर्य शहा हा पदकाचा मुख्य दावेदार मानला जात असून, आर्टिस्टिकमध्ये ओंकार शिंदे व सिद्धांत कोंडे यांच्यावर महाराष्ट्राची मदार आहे.