38th National Games Uttarakhand 2024-25 Maharashtra's Team Get Silver Medal in Gymnastics
देहरादून : अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॉस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्यपदकाची कमाई करीत पदकाचा श्रीगणेशा केला. महाराष्ट्राच्या उर्वी वाघ, शताक्षी टक्के, सलोनी दादरकर, अनुष्का पाटील व सारा रावूल यांनी रूपेरी यश संपादन केले. भागीरथी संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आर्टिस्टिक संघाने 124.60 गुणांची कमाई करीत रूपेरी यश संपादन केले.
पश्चिम बंगालच्या मुलींची सरस कामगिरी
प. बंगालने 126.85 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले, तर ओडिशाला 116.65 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या उर्वी वाघ, शताक्षी टक्के, सलोनी दादरकर, अनुष्का पाटील व सारा रावूल या संघाने उत्कृष्ट रचना सादर करून डोळ्यांची पारणे फेडली. केवळ वॉल्ट प्रकारात प. बंगालच्या मुलींनी सरस कामगिरी करून बाजी मारली.
इन्फिनिटी जिमनॅस्टिक क्लबमध्ये अजित जरांडे
ऊर्वी व शताक्षी या पुण्यातील इन्फिनिटी जिमनॅस्टिक क्लबमध्ये अजित जरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. सलोनी व अनुष्का या मुंबईच्या, तर सारा ही ठाण्याची खेळाडू होय. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या या महिला आर्टिस्टिक संघाने पुण्यातील इन्फिनिटी जिमनॅस्टिक क्लबमध्ये कसून सराव सराव केला होता. महाराष्ट्र सुवर्णपदकाचा दावेदार होता, पदक थोडक्यात हुकले असले तरी महाराष्ट्र संघाचे कौतुक करावे लागेल असे संघाचे प्रशिक्षक अजित जरांडे यांनी सांगितले. महाराष्ट्राला थोडक्यात सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याने सहाजिकच आम्हाला वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षका मानसी शेवडे यांनी दिली.