कर्टिस कॅम्फर(फोटो-सोशल मीडिया)
Curtis Kaemper created history with 5 wickets : क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात गोलंदाजाला हॅटट्रिक घेणे अधिक पसंत असते. ते प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. काही गोलंदाजांना यामध्ये यश देखील मिळते तर काहींना नाही. आजवर सलग ४ चेंडूत ४ विकेट घेणे असो वा सलग ३ चेंडूत ३ विकेट घेणे असो हे क्रिकेटमध्ये शक्य झाले आहे. परंतु सलग ५ चेंडूत ५ बळी घेणे हा तर एक चमत्कार असतो. पण, हा चमत्कार सत्यात उतरवला आहे एका आयर्लंडच्या गोलंदाजाने. ज्याने टी२० सामन्यात ‘डबल हॅटट्रिक’ घेऊन तसेच सलग ५ बळी घेऊन इतिहास रचला आहे. कर्टिस कॅम्फर या गोलंदाजाने क्रिकेट इतिहासात ५ चेंडूत ५ विकेट्स घेऊन क्रिकेट इतिहासात तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
आयर्लंडमध्ये स्थानिक टी२० स्पर्धा, आंतर-प्रांतीय टी२० ट्रॉफी खेळली जात आहे. याच स्पर्धेत, मुन्स्टर रेड्सकडून खेळणाऱ्या आयर्लंड क्रिकेट संघाचा वरिष्ठ अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्फरने मोठा कारनामा केला आहे. त्याने एका सामन्यात आपल्या अद्भुत कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. गुरुवारी, १० जुलै रोजी रेड्स आणि नॉर्थ-वेस्ट वॉरियर्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कॅम्फरच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सवर १८८ धावा केल्या होत्या. संघाचे नेतृत्व करणाऱ्या कर्टिस कॅम्फरने या सामन्यात २४ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्यासोबत त्याने चेंडूने देखील आपला जळवा दाखवला.
नॉर्थ-वेस्टच्या डावाची सुरुवात चांगलीम झाली नाही. या संघाने फक्त ११ षटकांमध्ये ५ विकेट्स गमावल्या. तर धावसंख्या तेव्हा केवळ ७८ धावा होती. पराभव समोर दिसत होता.पण कर्णधार कॅम्फरमुळे सामना फिरला. ज्याच्या मध्यमगती गोलंदाजीने कहर उडवला. पहिल्या षटकात ८ धावा देणाऱ्या कॅम्फरने दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार लागला. पण त्यानंतर फक्त विकेट्स यायला सुरवात झाली. या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने २ बळी मिळवले.
त्यानंतर जेव्हा तो त्याच्या पुढची ओव्हर टाकायला परतला तेव्हा त्याला हॅटट्रिक घेण्याची संधी मिळाली आणि त्याने ती सोडली नाही. त्याने नवीन ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याचा आंतरराष्ट्रीय सहकारी अँडी मॅकब्राइनला बाद करून आपली हॅटट्रिक पूर्ण केली. पण यावर त्याचे समाधान झाले नाही आणि त्याने पुढच्याच चेंडूवर आणखी एक बळी टिपला. अशा प्रकारे कॅम्फरने सामन्यात त्याची डबल हॅटट्रिक देखील पूर्ण केली. क्रिकेटमध्ये सलग ४ चेंडूत ४ बळी घेणे याला डबल हॅटट्रिक असे म्हणतात. कॅम्फरने यापूर्वीही हा पराक्रम करून दाखवला आहे. पण यावेळी मात्र त्याने इतिहास रचल्यानंतरच तो शांत झाला. कॅम्फरने जोश विल्सनच्या रूपात शेवटच्या फलंदाजाला बाद करून सलग ५ चेंडूत ५ बळी घेत इतिहास नोंदवला.
हेही वाचा : Ind vs Eng 3rd Test : लाईव्ह सामन्यात भारताला मोठा झटका! ऋषभ पंतला दुखापत; सोडावे लागले मैदान..
व्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाकडून सलग ५ चेंडूत ५ विकेट्स घेण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे कॅम्फरने जागतिक क्रिकेटमध्ये कायमचा एक मोठा विक्रम नोंदवून ठेवला आहे. त्याच्या कामगिरीमुळे नॉर्थ-वेस्ट संघ फक्त ८८ धावांवर गारद झाला आणि १०० धावांनी सामना गमावला. तसेच कॅम्फरने दुहेरी हॅटट्रिक घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ नसून त्याने ४ वर्षांपूर्वी २०२१ च्या टी२० विश्वचषकात देखील हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्याला सलग ५ बळी घेता आले नाही. मात्र, त्याने नेदरलँड्सविरुद्ध सलग ४ चेंडूव ४ गडी बाद करत दुहेरी हॅटट्रिकला गवसणी घातली होती.